निवडणूक जिंकण्यासाठी मोदी पाकिस्तानशी युद्धही करतील

0

नवी दिल्ली : निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात अपयश आल्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्धाच्या तयारीला लागले आहेत. पुढली लोकसभा जिंकता यावी, म्हणून मोदी पाकशी युद्धही करतील. त्याच युद्धासाठी पोषक वातावरणाची निर्मिती सध्या भाजप करतो आहे. कारण लोकमत भाजपविरोधात जाते आहे. मते मिळवण्यासाठी मोदी व भाजप काहीही करू शकतात, असे दिग्विजयसिंग यांनी म्हटले आहे.

जोधपूर येथे एका खासगी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आलेले दिग्विजयसिंग यांनी नेहमीप्रमाणेच मोदी व भाजप यांच्यावर सनसनाटी आरोप केले. मणिपूर व गोवा येथे जनमत भाजपविरोधात गेल्यावर त्या पक्षाने दरोडेखोरी करून बहुमत जमवले. देशात सर्वत्र भाजपविरोधी लोकमत तयार होत असल्याने, सध्या मोदी व अमित शहा विचलित झालेले आहेत. त्यांना 2019 ची लोकसभा निवडणूक घाबरवत आहे. त्यात यश मिळवण्यासाठी आता त्यांनी युद्धाची तयारी आरंभली आहे, असेही सिंग यांनी म्हटलेले आहे.

मागल्या काही वर्षांत आपल्या विचित्र विक्षिप्त विधानांनी व आरोपांनी चर्चेत असलेले दिग्विजयसिंग, कधीही आपल्या आरोपाचे पुरावे देत नाहीत. पण बेछूट आरोप करण्याचा त्यांचा खाक्या आहे. मतदानयंत्रांबाबतीतही त्यांनी कोणी इसम दोन कोटीत यंत्रात गफलत करून देतो असे म्हटलेले होते. पण त्या व्यक्तीची माहिती वा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला होता. मात्र, त्यांच्या अशा विधानांना माध्यमात खूप प्रसिद्धी मिळते आणि ते बेताल आरोप सातत्याने करीत असतात.