यावल। ईव्हीएम हटवून मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवणे, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी आदी 38 मागण्यांसाठी यावल तहसील कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा निघाला. त्यात तालुकाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. बहुजन क्रांती मोर्चासाठी तालुक्यातील विविध समाजातील नागरिक शनिवारी बाजार समितीच्या मुख्य आवारात एकत्र आले. येथून विजय साळवे कुंदन तायडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालय आल्यावर मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार योगिता ढोले यांना निवेदन दिले.
विविध 38 मागण्यांचे निवेदन
रमाकांत तायडे, अश्पाक शाह गफ्फार शाह, शेख अजहरोद्दीन आदींनी 38 मागण्यांचे निवेदन दिले. त्यात इव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर, शेतकरी कर्जमाफी, पुरोगामी विचावंतांना सरंक्षण, मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील शहीद मुरलीधर चौधरींचे हिंगोणा येथे स्मारक डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारणे आदी मागण्यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक आहिरे, सावदा फैजपूर येथील कर्मचार्यांनी बंदोबस्त ठेवला.