निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल

0

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने सर्व समन्वय अधिकार्‍यांनी ( नोडल ऑफीसर्स) योग्य ती पूर्वतयारी केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी समाधान व्यक्त केले असून सर्वांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, सुभाष डुंबरे, रमेश काळे, मोनिका सिंह, डॉ. जयश्री कटारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. राम यांनी प्रारंभी समन्वय अधिकार्‍यांकडून त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची आणि पूर्वतयारीची माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार असून पथनाट्ये, पोस्टर्स, वैयक्तिक भेटी, कलापथक अशा विविध साधनांचा वापर केला जाणार आहे.