जळगाव । जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात जिल्हा परिषद व पंचायत समित्याचे कोणताही अधिकारी,कर्मचारी निवडणुक प्रचाराशी संबंधीत कामात दिसला तर त्याच्यावर थेट पोलिसात गुन्हा दाखल करायची सुचना पोलिसांना केली आहे. अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. तसे करतांना कोणीही आढळले तर माझी परवानगी न घेता गुन्हा दाखल करावा असेही पाण्डेय यांनी म्हटले आहे.
बीडीओला ‘शोकॉज’ नोटीस
आचारसंहिता लागु झाल्यानंतर 13 जानेवारी रोजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया आणि विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नाशिक येथे घेतलेल्या बैठकीत निवडणूक काळात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचार्यांनी मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशान्वये चौकशी केली असता यावल येथील गटविकास अधिकारी. हे मुख्यालयात हजर नव्हते म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच आचारसंहितेच्या नियमान्वये जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचार्यांनी जर आचार संहितेचा भंग केला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्याअनुषंगाने पोलीसांना आदेश देण्यात आले आहे.त्यामुळे निवडणुक काळात तालुका अधिकारी व जिल्हास्तरावरील अधिकारी यांनी माझी परवानगी न घेता मुख्यालय सोडू नये असे मुख्य कार्यकारी अधिकारी पाण्डेय यांनी दिले आहेत.