गर्दीसाठी 300 ते 500 रूपये रोज : राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शनाचे प्रयत्न
जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूकीने गावागावातील बेरोजगारांना काहि दिवसांकरीता का होईना पण रोजगार दिला आहे. प्रचारात दिवसभर फिरण्यासाठी 300 ते 500 रूपये रोज राजकीय पक्षांकडुन मिळत असल्याची चर्चा आहे. गर्दी जमवुन राजकीय पक्षांकडुन शक्तिप्रदर्शन केले जात आहे.
निवडणुकीसाठी तरूणांच्या समुहांवर नजर
दुष्काळाच्या परिस्थीतीत बेरोजगार असलेल्या हातांना काम देण्यासाठी निवडणूक धावुन आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे गावागावातील राजकारण ढवळुन निघत आहे. प्रत्येक गावातील तरूणांच्या समुहावर राजकीय पक्षांकडुन नजर ठेवली जात आहे. या तरूणांच्या समुहाला हेरून त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा देऊन प्रचाराच्या रणांगणात उतरविले जात आहे. तसेच गावातील महिलांना देखिल प्रचारात सहभागी करून घेतले जात आहे. प्रचारात सहभागी होणार्यांना 300 ते 500 रूपये रोज दिला जात आहे.
गर्दीसाठी गावप्रमुखावर जबाबदारी
प्रचार दौर्याचे नियोजन करतांना ज्या गावात प्रचार आहे त्या गावातील प्रमुख शोधुन त्याच्यावर गर्दी आणण्याची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यासाठी या प्रमुखाला देखिल हवे ते दिले जात आहे.
भर उन्हात उमेदवारांची दमछाक
जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. या भर उन्हात देखिल राजकीय पक्षांचे उमेदवार सकाळी 8 वाजेपासून प्रचारासाठी बाहेर पडत असुन भर उन्हातही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहे. उन्हाची तमा न बाळगता उमेदवारांनी आपला प्रचार सुरूच ठेवला आहे. मात्र आग ओकणारा सुर्य उमेदवारांचा चांगलाच घाम गाळत आहे.
ढोल-ताशावाल्यांचीही चांदी
पाच वर्षातुन निवडणुक एकदाच येत असल्याकारणाने जिल्ह्यात ढोल-ताशाला मोठी मागणी येत आहे. ढोल-ताशेवाल्यांचा गृप उमेदवारांकडुन मुबोली रक्कम वसुल करून घेत आहे. त्यामुळे ढोल-ताशावाल्यांचीही चांगलीच चांदी होत आहे. राजकीय पक्षांकडुन जेवणावळी दिवसभर प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांची भूक शमविण्यासाठी रात्री जेवणावळी देखिल राजकीय पक्षांकडुन दिल्या जात आहे.