कराची-डिसेंबर २००७ मध्ये निवडणूक प्रचारावेळी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांची हत्या करण्यात आली होती. आता ११ वर्षांनंतर त्यांचा मुलगा बिलावल भुट्टोला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बॉम्ब, बंदुकांऐवजी लाठी, दगडांनी बिलावल यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) वर्चस्व असलेल्या ल्यारी येथे संतापलेल्या आंदोलकांनी पक्षाध्यक्ष बिलावल भुट्टो यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये दोन लोक जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बिलावल यांनी अशा हिंसेमुळे आपण घाबरणार नसल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलावल हे रविवारी ल्यारीतील बगदादी परिसरात निवडणूक प्रचारासाठी गेले होते. त्याचदरम्यान सुमारे १०० आंदोलकांनी ‘बिलावल वापस जाओ’ ची घोषणा देण्यास सुरूवात केली आणि वाहन ताफ्यावर दगडफेक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिलावल यांना दुखापत झाली नाही. पण यामध्ये एक ट्रक आणि काही कारचे मोठे नुकसान झाले.
ल्यारी हा पीपीपीचा पारंपारिक मतदारसंघ आहे. तर बिलावल हे एनए-२४७ मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. येत्या २५ जुलैला तिथे निवडणुका होणार आहेत. माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.
हल्ल्यात दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचे पक्षाचे नेते सईद गनी यांनी सांगितले. तेहरीक ए इन्साफ आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट हे दोन पक्ष या हिंसेसाठी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, बिलावल यांनी अशा हिंसेमुळे आपण घाबरणार नसल्याचे सांगितले. ल्यारी माझ्या रक्तात आहे. पक्षाचा जाहीरनामा घेऊन मी देशाच्या कानाकोपऱ्यात जाईन. आम्हाला या हिंसक तत्वांना पराभूत करायचे आहे. अशा विघातक शक्ती मला घाबरवू शकणार नाहीत, असे बिलावल यांनी म्हटले.