निवडणूक लढवण्याची इच्छा नाही मात्र गरज पडल्यास स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी सक्षम

0

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंचा सूचक इशारा ; रावेर विधानसभा मतदारसंघ भाजपच जिंकण्याचा केला दावा

फैजपूर- तब्ब्ल 40 वर्ष पक्षासाठी रक्ताचे पाणी केले, अनेकदा तुरूंगात गेलो, प्रसंगी लाठ्या-काठ्या खाल्ल्या व गेल्या 15 वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. काँग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आम्ही चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की आहे की राज्यात सरकार आणले पण मंत्री पद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची अजिबात इच्छा नाही कारण अशीच परीस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले. दरम्यान, खडसे यांच्या या वक्तव्यामागे अनेक राजकीय कंगोरे असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. सरकारविरोधात खडसेंनी अनेकदा आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे शिवाय भाजपा सरकारकडून खडसेंना न्याय मिळत नसल्याने खान्देशातील कार्यकर्त्यांसह खडसेंना मानणार्‍या चाहत्यांमधून कमालीची नाराजी आहे त्यामुळे खडसे आगामी निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. खडसे यांनी रावेर विधानसभा मतदारसंघ भाजपाच जिंकणार असल्याचेही प्रसंगी भाषणात सांगितले.

फैजपूरला बुथप्रमुखांचा मेळावा
भारतीय जनता पार्टीचा रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सोमवारी सकाळी 10 वाजता फैजपूर येथे खंडेराव वाडी मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा उपाध्यक्ष अस्मिता पाटील, जिल्हासह कार्यवाहक अजय सूर्यवंशी होते.