भुसावळ | तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीसाठी ऐन हिवाळ्यात तालुक्यात राजकीय आखाडा तापला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडाला असून भाजपाचे आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या पॅनलमध्ये रंगतदार लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे. 26 नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असून दुसर्या दिवशी लागलीच 27 रोजी निकाल जाहीर होणार आहे. भुसावळ तालुक्यासह बोदवड तालुक्यातील काही गावांमध्ये तालुका शेतकी संघाचे मतदार असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी करीत प्रचाराला वेग दिला आहे. प्रत्यक्षात आजी-माजी आमदार प्रचारात सहभागी नसलेतरी प्रतिष्ठा ठरलेल्या निवडणुकीसाठी त्यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते व उमेदवार जोमात कामाला लागले असून ग्रामीण भागात चांगलेच वातावरण तापले आहे.
15 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात
26 नोव्हेंबर रोजी होणार्या निवडणुकीत 15 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत. जामनेर रोडवरील म्युन्सीपल हायस्कूलमध्ये सकाळी आठ ते चार दरम्यान मतदान होणार आहे. व्यक्तीगतसाठी सहा तर सोसायटीसाठी एक मतदान केंद्र असणार आहे. 27 रोजी तापी नगरातील हिंदू हौसिंग सोसायटीत निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पारंपरीक पद्धत्तीने अर्थात मतपत्रिका टाकून मतदारांना मतदान करता येणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून आर.आर.पाटील काम पाहत आहेत.