मल्लापुरम । एकीकडे भाजप गोहत्या आणि गोमांसाच्या विक्रीवर बंदी आणत आहेत, तर दुसरीकडे भाजपचाच उमेदवार निवडणुकीत चांगल्या दर्जाचें बीफ पुरवणार असल्याचं आश्वासन देत आहे. ही घटना आहे केरळमधल्या मल्लापुरमची. सध्या मल्लापुरम या लोकसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक होत आहे.
त्यासाठी तिथल्या मतदारांना भाजपचे उमेदवार श्री प्रकाश यांनी चक्क निवडून आल्यास केवळ बीफ नाही तर चांगल्या दर्जाचें बीफ उपलब्ध करून देणार असं आश्वासन दिलं आहे. एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आश्वासन मतदारांना दिलंय. पत्रकार परिषदेत प्रकाश म्हणाले की, निवडणून आल्यावर ते चांगल्या दर्जाचे बीफ लोकांना उपलब्ध करून देणार, तसंच त्यांनी गोहत्येसाठी काँग्रेसला जबाबदार ठरवलं असून जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी अनेक राज्यात गोहत्येला प्रतिबंध लावला होता. भाजपच्या नेत्याचं हे वक्तव्य अशा वेळी आलं जेव्हा भाजपची सत्ता असलेलं राज्य छत्तासगढचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी गोहत्या करणार्याला उलटं लटकवण्याची भाषा केली होती. तसंच त्यांनी छत्तीसगढमध्ये गोहत्या होत असल्याचं फेटाळून 15 वर्षांत असं एकही प्रकरण आलं नसल्याचं सांगितलं. तसंच जर कुणी हत्या केलीच तर त्याला उलटं लटकवण्यात येईल.
एकीकडे भाजपनं गोहत्या आणि गोमांसाची तस्करी रोखण्यासाठी गुजरातमध्ये गो संरक्षण अधिनियमात सुधारणा केली आहे. आता नवीन कायद्यानुसार गोहत्या आणि गोमांसाची तस्करी करणार्याला आजीवन कारावासाच्या शिक्षेचं प्रावधान केलं आहे. तर दुसरीकडे भाजपचेच उमेदवार केरळसारख्या राज्यात लोकांना खूश करण्यासाठी लोकांना चांगल्या दर्जाचे गोमांस उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देत आहे.