निवाड्याविरुध्द व्यथित होऊन उपोषण

0

जळगाव । सरकारला तालुक्यातील मौजे तरसोद, नशिराबाद, आसोदा येथील भुसावळ-जळगाव तिसर्‍या लाईनसाठी संपादित होत असलेल्या जमिनीचे मालकांनी, प्रकल्पातील भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 कायद्याच्या अन्वये कलम 11 ची नोटीस प्रकाशित केल्यापासून आजतागायत नोंदविलेल्या हरकतींच्या अनुषंगाने आजपावेतो भूसंपादन प्रक्रियेत शेतकर्‍यांचा कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष सहभाग न नोंदविता. दि. 2 जून रोजी बेकायदेशीर व अपारदर्शक स्वरुपाचा एकतर्फी निवाडा पारीत केल्यामुळे या निवाड्याविरुध्द व्यथित होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

सहभागी पिडीत उपोषणार्थी
रमेश चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, नरेंद्र नारखेडे, मधुकर कावळे, योगेश बर्‍हाटे, चुडामण चौधरी, अशोक अलकरी, पद्माकर बर्‍हाटे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, रामचंद्र कुंभार, बाबुराव पाटील, मधुकर चौधरी, संतोष अस्वार, डिगंबर कावळे, भागवत पाटील, संजीव कावळे, गोपाळ भोळे, दिनेश अत्तरदे, श्रीकांत भोळे, चंदन अत्तरदे, भूषण देवरे, अरुण देवरे, मिलिंद कौंडिण्य, नीळकंठ देवरे, प्रशांत पाटील, सुभाष कोळी, रविंद्र पाटील, पंढरीनाथ बर्‍हाटे, किसन झटके, संदीप नारखेडे, विकास पाटील आदी.

शेतकर्‍यांच्या मागण्या
जळगाव खुर्द येथे शासनाची जमिन उपलब्ध असतांनादेखील त्यांचा उपयोग न करता शहरापासून 5 ते 6 कि.मी. अंतरासाठी जमिन अधिग्रहीत करीत असलेल्या जमिनीलगत औद्योगिक प्रकल्प अस्तित्वात आहे. त्यामुळे मिळकतींचे मूल्यांकन वाणिज्य मूल्यांकनानुसार करण्यात यावे, मोजणी योग्य व बरोबर करुन त्या मोजणीबाबत शेतकर्‍यांना मागणी केल्यास दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यात यावे. प्रत्यक्ष उतारे वेगळे असतांनाही एकत्रित गट दाखविल्याबाबतचा खुलासा व्हावा. संपादित क्षेत्रात जात नसातांनाही काही शेतकर्‍यांची पोटविभागणी होऊन त्यांची नावे बेकायदेशीर नमुद केली आहे. शेतकर्‍यांच्या पुनर्वसन व पुनस्थापनेबाबत नियम 2015 च्या तरतुदीप्रमाणे कलम 16 ते 19 प्रमाणे जनसुनावणी घेऊन घरोघरी चौकशी व्हावी, तसेच बाधीत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनात सामावून घेण्याबाबत ठोस कार्यवाही व्हावी अशा मागण्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत.