निवासी डॉक्टर नसल्यामुळे निरवांगीत गैरसोय

0

इंदापूर : तालुक्यातील निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुखसुविधा तसेच निवासी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अशुद्ध पाणी, इनव्हर्टर नसल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे बावडा-कळंब या महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावर आहे. मात्र, दिवसभर वैद्यकीय अधिकारी असतात त्यानंतर पाच वाजताच गायब होत असल्याने जबाबदारीच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचे काम चतुर्थश्रेणी नर्सेना पाहावे लागते आहे. ग्रामीणभाग असल्याने प्रसूतीसाठी महिला रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, वैद्यकीय अधिकारी जागेवर नसल्यामुळे खासगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागतात. या उपकेंद्रांतर्गत रणगाव, निमसाखर व रेडणी ही जिल्हा परीषदेच्या अंतर्गत आरोग्य उपकेंद्र आहेत. या भागात वैद्यकीय अधिकारी यांचे लक्ष नसल्यामुळे खासगी दवाखान्यात महागडे उपचार घेण्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

रुग्णांना शुद्ध पाणी गरजेचे असतानादेखील मिळत नाही कोणतीही फिल्टर पाणी न करता अशुद्ध बोअरचे पाणी प्यावे लागते आहे. तर रात्री जर विद्युत पुरवठा खंडीत झाला तर मेणबत्तीच्या उजेडात रुग्णांना राहावे लागते. पर्यायी विजेची व्यवस्था हे आरोग्य केंद्र करण्यात अपयशी ठरले आहे. येथील वैद्यकीय अधिकारी हे बारामती येथे राहतात त्यामुळे हक्काचा निवासी वैघकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात गेल्या एक ते दीड वर्षांपासून लाभलेला नाही. प्रसूतीसाठी महिला रुग्ण रात्री आल्यास वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे मानसिक त्रासासह आर्थिक अडचण सोसावी लागते.

त्यामुळे या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी नियमाप्रमाणे मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. पूर्वी वैघकीय अधिकारी या ठिकाणी रूजू होण्याआधी पहिले वैद्यकीय अधिकारी या गावी खासगीरूम घेऊन निवासी राहत होते, मात्र आता वैद्यकीय अधिकारी बारामती येथे राहत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामाना करावा लागतो आहे.

निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्राला निवासी राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे निवासी राहू शकत नाही. याठिकाणी निवासस्थान इमारत उभारावी म्हणून वरिष्ठ कार्यालयास कळविले आहे.
डॉ. सुरज माने, वैद्यकीय अधिकारी, निरवांगी प्राथमिक केंद्र