पुणे : बर्याच दिवसानंतर खासदार संजय काकडे एकदम सक्रीय झाले; पण ते भाजपवर नाराज आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे. या नाराजीचे राजकीय परिणाम सध्याच्या भाजपवर किती होतील? याचेही अंदाज बांधले जात आहेत. समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा ठेकेदारांनी संगनमताने भरल्या असा आरोप काकडे यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केला आहे. निविदा आणि भाजप हा घोळ गेले काही दिवस चालू आहे. शहराचे आरोग्य धोक्यात असताना औषध खरेदीच्या निविदा निघत नव्हत्या. याचवेळी समान पाणीपुरवठा योजनेसाठी महापौर मुक्ता टिळक यांची लगबग चालू होती. नेमक्या याच योजनेच्या निविदांबद्दल खा. काकडे यांनी शंका घेतल्या आहेत. काकडे यांचे वैयक्तिक मत आहे असे म्हणून भाजपकडून याकडे दुर्लक्ष केले जाईल का? याचेही राजकीय वर्तुळात कुतूहल आहे.
मित्रमंडळ भूखंड प्रकरणात खा. काकडेंची राजकीय गोची
पुणे महापालिकेत अलीकडे मित्रमंडळ येथील भूखंड वादग्रस्त झाला आहे. पालिकेचा भूखंड पालिकेच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळाले याचे कौतुक होत आहे आणि नगरसेवक आबा बागुल आणि सुभाष जगताप यांना त्याचे श्रेय वाटून दिले जात आहे. पण यात टीकेचा रोख काकडे कुटुंबीयांकडे होता. भाजपकडून अशावेळी कोणतेच सहाय्य मिळाले नाही याची खंत आहे. याच पार्श्वभूमीवर काकडे यांनी समान पाणीपुरवठा योजनेतच शंका घेतली आहे. काकडे हे अपक्ष खासदार आहेत. परंतु, महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपची ताकद वाढविली, यासाठी अनेक कार्यकर्त्यांचे पक्षांतर घडविले. भाजपला दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर काकडे एकदम पडद्याआड गेले. मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असूनही पुण्याच्या भाजपमध्ये त्यांचे काही चालत नाही. महत्वाच्या कार्यक्रमातही ते दिसत नाही. शहर भाजपातील स्थानिक नेते खा. काकडेंना टाळत असून, त्यांना वाळीत टाकल्याचे चित्र आहे.
भाजपला आता घरचे आहेर सुरु!
भाजपमध्ये परंपरेतून आलेले 48 नगरसेवक आहेत आणि 40 नगरसेवक पक्षांतर करून आलेले आहेत. या 40 जणांमध्ये काकडे यांना मानणारे सर्वाधिक आहेत. त्यामुळे आताच्या खा. काकडे यांच्या भूमिकेमुळे पक्षात अडचणी निर्माण होणार आहेत. मध्यंतरी महापालिकेतील पदाधिकारी आणि पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात संघर्ष झाला, त्यावेळी मुंढे यांना समजाऊन घ्या असा सल्ला खासदार अनिल शिरोळे यांनी दिला होता. त्यानंतर वाद मिटला. तसाच प्रतिसाद काकडे यांना मिळेल का? हा कळीचा प्रश्न आहे. महापालिकेत भाजपची सत्ता येऊन सहा महिनेही पूर्ण झालेले नाहीत आणि पक्षातून घराचे आहेर मिळू लागले आहेत. खा. काकडे यांच्या पत्राला केवळ प्रशासकीय महत्व आहे, असे म्हणता येणार नाही. त्यापाठोपाठ राजकीय संदर्भ आपोआप चिकटणार आहेत.