निवृत्तीच्या वेळापर्यंत विराट मोडेल सर्व विक्रम

0

नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजी कौशल्याचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीस काढण्याची कुवत असणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहलीची तुलना केली जाऊ लागली. लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांनीही आता कोहलीचे कौतुक करताना तो रचत असलेल्या विक्रमांचा दाखला दिला. कोहली त्याच्या निवृत्तीच्या टप्प्यात पोहोचेल तेव्हा त्याने फलंदाजीतले सर्व विक्रम मोडीत काढलेले असतील, असे त्यांनी म्हटले आहे.

कोहलीची भूक दिवसागणिक वाढतेय

कोहलीने आपल्या धावांची गती अशीच कायम ठेवली तर आगामी काळात नक्कीच क्रिकेट विश्वात नव्या विक्रमांची नोंद होताना आपल्याला दिसेल. फलंदाजीवेळीचा कमालीचा आत्मविश्वास, मोठी खेळी करण्यासाठीची भूक आणि खेळपट्टीवरचा कोहलीचा अचूक समतोल हे पाहता कोहलीच्या निवृत्तीपर्यंत फलंदाजीतले सर्व विक्रम त्याच्या नावावर असतील, असे गावस्कर म्हणाले. कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे. सलग चार कसोटी मालिकांमध्ये कोहलीने चार द्विशतके ठोकण्याचा पराक्रम कोहलीने केला. असे करणारा तो पहिला फलंदाज ठरला. धावांचा पाठलाग करताना कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. प्रत्येक सामन्यात धावा वसुल करण्याची कोहलीची भूक दिवसागणिक वाढताना दिसते, यावरून त्याची पात्रता समजून येत असल्याचेही गावस्कर म्हणाले. २८ वर्षीय कोहलीच्या खात्यात आतापर्यंत एकूण ४३ शतके जमा झाली आहेत. प्रत्येक प्रतिस्पर्धी संघ कोहलीला बाद करण्यासाठी योजना आखताना दिसतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वच संघांना कोहलीने आपल्या दमदार कामगिरीने दखल घेण्यास भाग पाडले आहे. ट्वेन्टी-२० विश्वात कोहली सध्या सर्वोत्तम फलंदाज आहे. तर कसोटी क्रमवारीत कोहली दुसऱ्या आणि एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.