पुणे । एकट्या राहणार्या एका निवृत्त कर्नल महिलेला आधार देण्याच्या बहाण्याने रिक्षाचालक पती-पत्नी यांनी तिला आपलेसे केले. त्यानंतर महिलेच्या चेकवर सह्या घेतल्या आणि 70 लाख 57 हजार रुपये काढून घेतले.वानवडी परिसरात हा प्रकार घडला असून याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लक्ष्मी कृष्णा मेनन (74, रा. रास्ता पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून वसंत रामचंद्र भातखांडे आणि त्याची पत्नी मंगल वसंत भातखांडे (रा. रोहिणी अपार्टमेंट, फातिमानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेनन या लष्कराच्या आर्म फोर्स मेडीकल कॉलेज(एएफएमसी) मधून लेफ्टनंट कर्नल पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. पुण्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यांची फसवणूक करणारा भातखांडे हा रिक्षा चालक आहे. मेनन या सतत आजारी असतात. रुग्णालयात उपचाराला जाण्यासाठी रिक्षातून प्रवास करताना त्यांची आणि भातखांडेची ओळख झाली.
गुंगीचे औषध देऊन चेकवर घेतल्या सह्या
दोघेही त्यांना चांगली मदत करू लागल्यामुळे मेनन यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. एक दिवस घसरून पडल्यानंतर भातखांडे आणि त्याच्या पत्नीने त्यांना सांभाळ करतो, असे सांगून स्वत:च्या घरी नेले. या काळात दोघांनी मेनोन यांना गुंगी येणार्या औषधाच्या गोळ्या खाऊ घालून त्यांच्याकडून चेकवर सह्या घेतल्या. अनेकदा एटीएम कार्ड वापरून त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले. मार्च 2016 ते मार्च 2017 या कालावधीत या पती-पत्नीने मेनन यांच्या बँक खात्यातून तब्बल 70 लाख 57 हजार रुपयांची रोकड काढून घेतली. हा प्रकार मेनन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. उपनिरीक्षक आर. पी. बागूल या प्रकरणाचा तपास करत आहेत.