निषेधासाठी पीएमपीचा ‘बळी’

0

पुणे । कोणत्याही घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पीएमपी किंवा एसटी सहजसोपे माध्यम असते. बसेसचे नुकसान झाले म्हणजे बंद यशस्वी झाला, असे निषेध करणार्‍यांना वाटते. यामुळे बस यामध्ये नाहक बळी पडतात. ज्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नुकसान करतात त्यांच्याकडूनच नुकसान भरपाई घेतली पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले असताना देखील मागील 5-10 वर्षात एक रुपयाही जिल्हाधिकारी कार्यालयाने वसूल केला नाही, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केले.

गणशोत्सवादरम्यान कार्य करणार्‍या पीएमपी कर्मचार्‍यांचा निनाद पुणे आणि निनाद पतसंस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक राजेश येनपुरे, शुभदा जोशी, संजय कुसाळकर, भारत भूमकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवात मोफत रुग्णवाहिकेची सेवा देणार्‍या रोटरी क्लब ऑफ साऊथच्या सदस्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.

भारत जगाचे प्रतिनिधीत्व करेल
पीएमपीचे चालक स्वत:च्या घरातील गणेशोत्सव बाजूला ठेऊन नागरिकांना त्यांचा गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी कामावर रुजू होतात. कोणताही अपघात न करता त्यांची ने-आण योग्य पद्धतीने करण्याचे काम चालक अहोरात्र करीत असतात, असे वेलणकर यांनी सांगितले. समाज जीवनाचा विचार प्रत्येकाने केला तर भविष्यात भारत नक्कीच जगाचे प्रतिनिधीत्व करेल, असे गोगावले यांनी सांगितले. शासनाच्या कोणत्याही व्यवस्थेत काम करताना त्या व्यवस्थेवर प्रेम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. अनुप जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उदय जोशी यांनी प्रास्ताविक केले.