सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेमणुकांमुळे भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल
बारामती : राज्यसरकारने स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारातील संस्थांवर प्रतिनिधी नेमलेले आहेत. यापद्धतीनेच बारामती तालुक्यात बारामती सहकारी दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना या महत्त्वाच्या संस्थांबरोबरच इतरही संस्थांवर शासन नियुक्त संचालक नेमण्यात आलेले आहेत. हे संचालक अभ्यासू व भाजप निष्ठावान कार्यकर्ते असावेत असा हेतू होता; मात्र बारामती तालुक्यात या हेतूलाच हरताळ फासण्यात आला आहे. या निमित्ताने सहकारी संस्थांच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर नियंत्रण यावे व या संस्थांमधील गैरव्यवहाराला आळा बसावा असाही हेतू होता. मात्र बारामती तालुक्यात भाजपने निष्ठावंतांना डावलून वशिलेबाजीने नेमणूका केलेल्या आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.
संचालकांनी पक्षासाठी शून्य टक्के काम केले
सध्या नेमण्यात आलेले संचालक हे राष्ट्रवादीच्या संचालकांबरोबर हातात हात मिळवून राष्ट्रवादीचे काम करीत आहेत. हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डोळ्यांसमोर दिसत असल्यामुळे भाजप निष्ठावान कार्यकर्ते मौन बाळगून आहेत. मात्र काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या या कारभारावर प्रचंड नाराज आहेत. बारामती तालुक्यातील सहकारी संस्था माळेगाव कारखान्याचा अपवाद वगळता व स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे शासन नियुक्त संचालक संस्थेच्या कारभाराकडे अर्थपूर्णरित्या दुर्लक्ष करीत आहे. एका भाजपच्या पदाधिकार्याने सांगितले की, बारामती तालुक्यात या संचालकांनी भाजप वाढण्यासाठी काम करण्याऐवजी भाजप कसा संपेल याच दृष्टीने काम सुरू केले आहे. शासननियुक्त संचालक झाल्यानंतर या संचालकांनी पक्षासाठी शून्य टक्के काम केले आहे.
भाजपचे काम करतील का?
याबाबतचा किस्सा सांगताना कार्यकर्ता म्हणाला, इंदापूरच्या आमदारांबरोबर या संचालकांचे चांगलेच संबंध आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता हे संचालक भाजपचे काम करतील की नाही अशी शंकाही येत आहे. कारण हे संचालक सदासर्वदा राष्ट्रवादीच्याच संचालकांबरोबर असतात. त्यामुळे भाजपने नेमणूक केलेले संचालक पक्षासाठीही हितकारक नसून अपायकारकच आहेत. अशी टिप्पणीही या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळेच नसून नफा आणि असून खोळंबा अशी परिस्थिती बारामती तालुक्यातील भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झालेली आहे. या परिस्थितीला आम्ही नक्कीच वाचा फोडू आम्ही शांत बसून राहणार नाही, वरिष्ठांना याबाबतची परिस्थिती कळवू असेही या कार्यकर्त्यांनी सांगितले.