पिंपरी-चिंचवड : अथर्व थिएटर्सतर्फे दरवर्षीप्रमाणे पाच नोव्हेंबर रोजी जागतिक मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त संस्थेच्या वतीने संस्थेचे जेष्ठ रंगकर्मी, मार्गदर्शक, संस्थापक सदस्य, उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक डॉ. हेमंत हुईलगोळकर आणि संस्थेचा तरुण कलाकार प्रज्ञेश भट्टू यांचा सत्कार करण्यात आला.
हुईलगोळकर यांचा सत्कार
अथर्व संस्थेला 16 वर्षे पूर्ण झाली असून संस्थेने आजवर विविध विषयांवरील दमदार नाटकांचे 300 पेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. डॉ. हुईलगोळकर यांनी ’झोपी गेलेला’ नाटकात साकारलेली डॉ. आठवले यांची भूमिका तसेच ’मोरूची मावशी’ नाटकात साकारलेली राव बहाद्दूर टोणगे यांची भूमिका अत्यंत गाजली. त्यांच्या या योगदानाबद्दल प्रदीप मुजुमदार यांच्या हस्ते डॉ. हुईलगोळकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रज्ञेश अथर्वच्या अनेक नाटकांमधून अभिनय, प्रकाश, संगीत संयोजन, रंगमंच व्यवस्था अशा अनेक महत्वपूर्ण जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडत आहे. अरुंधती कामत यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजीवकुमार पाटील, उपाध्यक्ष डॉ. मंदार जोगळेकर, उपस्थित होते.
नाट्यवाचन, गायन
रंगभूमी व नटराजाची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जयवंत दळवी लिखित ’बॅरिस्टर’ या नाटकाचे वाचन करण्यात आले. वाचनात संस्थेच्या रुपाली पाथरे, गौरी लोंढे, डॉ. प्रशांत जीवतोडे, डॉ. प्रयाग वर्पे, डॉ. धीरज कुलकर्णी, शाल्मली कुलकर्णी, संकेत लोंढे, अजय मित्रगोत्री, कामठे आदी कलाकारांनी भाग घेतला. ईशानी कुलकर्णी, डॉ. प्रशांत जीवतोडे या कलाकारांनी काही गाणी सादर केली.