निष्ठा, मेहनत विजयासाठी आवश्यक गोष्टी – नाना शिवले

0

प्रेरणा विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम

रावेत : असामान्य बुद्धीमत्ता आणि प्रतिभा जवळ असली तरी निष्ठा, बांधिलकी व मेहनत या गोष्टी विजयासाठी आवश्यक आहेत. त्यांच्या बळावरच खेळाडू सर्वोच्च स्थान पटकावून तेथे टिकून राहतात. निर्धार केला तरच कोणतेही कौशल्य प्राप्त करता येते. कोणताही दर्जा गाठता येतो, असे मत शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले. प्रेरणा विद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा महाजन, प्राचार्या शुभांगी इथापे, पालक प्रतिनिधी संगिता पाटील आदी उपस्थित होते.

खेळासाठी प्रोत्साहन द्यावे
शिवले पुढे म्हणाले की, पालक व शिक्षकांनी मुलांना अभ्यासाबरोबर खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.अभ्यासासाठी मुलांची मने तंदुरुस्त आणि प्रसन्न राहावी याकरिता मुलांना मैदानावर नेलेच पाहिजे. यातून मुलांची उर्जा खर्च हेऊन त्यांच्यावर संघभावनेचे संस्कार होतात. ऑलिंपिक विजेती विल्मा रुडॉल्फ, खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या जिद्द व मेहनतीची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. मुख्याध्यापिका सीमा महाजन यांनी सर्व बक्षीसपात्र मुलांच्या यशाचे कौतुक केले. कृष्णा निमगिरे व त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पोवाडा सादर केला. शिवले यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व पालकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी ब्रम्हे यांनी केले. विलास शिंदे, विशाल केदारी, सतिश शेवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.