पुणे : केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणून चित्रपट न बनवता आपण ज्या निष्ठेने चित्रपट बनवतो त्याला राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून समाजात विशेष स्थान मिळतं. हे खरंच प्रोत्साहन देणार आहे, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केली.
सुमित्रा भाव व सुनील सुकथनकर दिग्दर्शितकासव या चित्रपटाला शुक्रवारी सुवर्णकमळ जाहीर झाले. त्यावर भावे आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या. कासव हा वेगळ्या प्रकारचा चित्रपट असल्याने याला सुवर्णकमळ मिळेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. नैराश्यातून तरुणांनी बाहेर कसं यावं, हे सांगणारा हा चित्रपट आहे, असे त्या म्हणाल्या.
नैराश्यावर बोलते व्हा
निर्माता मोहन आगाशे, इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम आणि चित्रपटातील सर्व कलावंतांची मला आता आठवण येतेय. चित्रपटामध्ये सर्वांनीच फार छान काम केले आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, यंदा जागतिक आरोग्य जागृती दिनानिमित्त नैराश्यावर बोलते व्हा अशी संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आमचा चित्रपट प्रदर्शित होतोय, याचाही आनंद होतो आहे.
कासवाद्वारे नैराश्यावर भाष्य
चित्रपटाच्या कासव या नावामागची भावना काय होती, हे सांगताना त्या म्हणाल्या, कासव हा महत्त्वाचा प्राणी आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला, की ते घाबरतं आणि लगेच स्वतःचे अवयव ते कवचाच्या आत मिटून घेतं. त्याचप्रमाणे निराश झालेली व्यक्तीही अगदी तशीच वागते. अशावेळी आपण त्या व्यक्तीला सांभाळून घेणं, मायेची उब देणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही चित्रपटात कासवाचा उल्लेख दाखवून नैराश्य आलेल्या व्यक्तींवर भाष्य केलं आहे.
अशी आहे संकल्पना
अंडी घालण्यासाठी कासवं किनार्यावर येतात आणि अंडी घालून समुद्रात परत जातात. अंडी शाबूत राहिली, तर त्यांतून पिल्लं बाहेर येतात आणि आपापली समुद्रात जातात. घटस्फोटित जानकी, तिचा ड्रायव्हर यदू, कासवांची पिल्ल वाचावीत म्हणून धडपडणारे दत्ताभाऊ, बाबल्या, रस्त्यावर वाढलेला परशू, स्वतःत हरवलेला तो अनामिक तरुण, त्याची वेदना समजून घेणारी, एकमेकांशी काहीही नातं नसणारी ही माणसं एकीकडे आणि दुसरीकडे अलिप्त, अहिंसक कासव या भोवती हा चित्रपट गुंफण्यात आला आहे.