मुंबई – करोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटाने महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, वादळाआधीच मंगळवारी रात्रीपासून किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
निसर्ग चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केले असून, किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळा पाऊस सुरू झाला आहे. वार्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनार्याला धडका मारू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जीवित हानी टाळण्यासाठी ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. तसेच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदत कार्यासाठी सज्ज झाल्या आहेत. रत्नागिरी किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणावर जोरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. याच दरम्यान मिर्या समुद्रात नर्मदा सिमेटचे जहाज भरकटले आहे. जहाजाचा नांगर तुटल्याने जहाज भरकटल्याची माहिती समोर आली आहे. जहाजाला समुद्र किनार्याजवळ आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.