पुणे – पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणात निसर्गाचे एक अनोख रुप पाहायला मिळाले आहे. अत्यंत दुर्मिळ, अशी एक घटना येथील काही नागरिकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. शुक्रवारी सायंकाळी धरण परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार वार सुटला होता. त्याचवेळी नाझरे धरणातील पाणी अचानकच एखाद्या वावटळीप्रमाणे आकाशाकडे झेपावले. ते नयनरम्य दृश्य येथील काही नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे.
अनोखा चमत्कार
राज्यात २ दिवसापूर्वी अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस बरसला. त्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पुरंदर तालुक्यातही आभाळ भरून आले होते. आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि सोसाट्याचा वाराही सुटला. दरम्यान, धरण परिसरात एक वीज जोरात कडाडली आणि त्यानंतर नाझरे धरणावर निसर्गाचा अनोखा चमत्कार सुरू झाला.
पाण्याच्या पृष्ठभागावर वावटळी प्रमाणे वारे घोंगावू लागले आणि त्या वावटळीत धरणातल्या पाण्याने बघता बघता आकाश गाठले, ती पाण्याची वावटळ संपूर्ण नाझरे धरणावर फिरू लागली. चक्राकार फिरणाऱ्या या पाण्याचे शेवटचे टोक उंच आकाशात जाऊन भिडले होते.
मोबाईलमध्ये कैद केले दृश्य
नाझरे परिसरात सुरू असलेला हा निसर्गाचा चमत्कार तेथील काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. धरणाच्या पाण्यावर हवेचा दाब अचानकपणे अत्यंत कमी झाल्याने ही नैसर्गिक घटना घडल्याचे जाणकार सांगत आहेत. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते तेव्हा मोठ्या पाण्याच्या क्षेत्रात हवेचा दाब तब्बल ९०० ते १००० हेक्टा पास्कल पर्यंत कमी होतो आणि अशा प्रकारे पाणी आकाशात उंचच उंच जाते.