भुसावळ। श्रावणाच्या सरींसोबत सातपुड्यातील हिरव्यागार डोंगररांगा, उंचावरुन पडणारे पाण्याचे धबधबे अशा मनोहारी निसर्ग सौंदर्याच्या वातावरणात दोन दिवस ज्येष्ठ नागरीक रमले. निमित्त होते वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाने आयोजित केलेल्या सहलीचे मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील इंदिरा सागर पुनासा धरण व इंदिरा सागर पॉवर स्टेशन येथे ज्येष्ठांची नुकतीच सहल जावून आली. निसर्गाच्या सान्निध्यात ज्येष्ठांनी आपले दुःख विसरुन जलाशयातून बोटीची सफरही केली.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन
आशिया खंडातील सर्वात मोठ्या धरणावर विजेची कशी निर्मिती होते हे प्रत्यक्षात पाहण्याचा योग ज्येष्ठांना आल्याने तेही भारावले. परतीच्या प्रवासात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शनही घेण्यात आले. वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय ढाके, उपाध्यक्ष सीताराम भंगाळे, सदाशिव सावकारे, संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.