भुसावळ । जीवनात ज्ञानार्जनाला फार महत्व आहे. आयुष्याच्या शेवट पर्यंत मनुष्य हा विद्यार्थीच असतो, निसर्ग म्हणजे ज्ञानाचा भांडार असून निसर्गातील प्रत्येक घटकाकडून आपल्याला नेहमी ज्ञान मिळत असते, परंतु ते आपण कसे आणि किती प्रमाणात घ्यावे हे आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असते हे सर्व मुल्याशिक्षणावर आधारित असते. तसेच यशस्वी होण्यासाठी नेहमी कठोर परिश्रम, एकाग्रता, चिकाटी आणि सातत्य या गोष्टीवर भर दिला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या अजय पवार यांनी केले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
जवाहर नवोदय विद्यालयात प्रेरणादायी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा युपीएससीत यश संपादन केलेले भडगाव येथील अजय पवार होते. तसेच इक्वीटस बँकेचे सहा.व्यवस्थापक गौतम धुंदलेे, रेल्वे स्कुलचे प्राचार्य आय.आय. खान, उपप्राचार्य एस.बी. कुलकर्णी, प्राचार्य व्ही. नारायण राव, उपप्राचार्य पी.आर. कोसे उपस्थित होते. एन.सी. उकास यांनी अतिथींचा परिचय करुन दिला.
शालेय जीवनातील आठवणींना उजाळा
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजय पवार यांनी आपल्या शालेय जीवनातील मार्मिकपणे जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करण्यासाठी कठोर परीश्रम करावे लागतात. याची विद्यार्थांना जाणीव करून दिली. हे बाळकडू मला जवाहर नवोदय विद्यालयात मिळाले. आणि म्हणुन मी विद्यालयाचा फार ऋणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शाळेचा नावलौकिक करा
अजय पवार यांनी या कार्यक्रमात विद्यार्थांशी प्रश्न -उत्तरांच्या माध्यमातून हितगुज केले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच मुलाखत ही व्यक्तित्व परीक्षण असते. त्यात आपले फक्त ज्ञान नाही तर आपले आतील सौंदर्य बघितले जात असल्याचे सांगितले. प्राचार्य व्ही. नारायण राव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी अजय पवार यांचा आदर्श समोर ठेऊन नागरि सेवा परिक्षांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीद्वारे यश संपादन करुन विद्यालयाचे नावलौकिक करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.सी.उकास यांनी केले. तर उपप्राचार्य पी.आर. कोसे यांनी आभार मानले.