सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली : विविध सेवांसाठी आधारकार्ड जोडणी अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरूद्ध दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान नीट परीक्षेसाठी आधारकार्ड अनिवार्य नसल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले, की राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) देणार्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई आधारकार्ड अनिवार्य करू शकत नाही. तसेच सीबीएसईने त्यांच्या संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे.
विद्यार्थी अन्य पुराव्यांचा वापर करू शकतात
या सुनावणीत न्यायालयाने असेही म्हटले की, अशाच प्रकारच्या अन्य राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांसाठीही आधार अनिवार्य असणार नाही. यासाठी मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक आदीचा वापर विद्यार्थी करू शकतील. अटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, सरकारने सीबीएसईला आधारकार्ड अनिवार्य करण्यास सांगितलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिल्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो. विविध सुविधांसाठी केलेली आधारसक्ती आणि आधार जोडणीविरूद्ध सध्या सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी सुरू असून, ही सुनावणी मध्यावर आली आहे. याचिकाकर्त्यांचे वकिल सध्या आपला युक्तिवाद मांडत आहेत. यानंतर सरकार पक्ष आपले म्हणणे मांडणार आहे. यासाठी आणखी काही आठवडे लागणार असून, यामध्ये सर्वोच्च न्यायालय आधार जोडणीची 31 मार्चची मुदत आणखी वाढविण्याची शक्यता आहे.