‘नीट’साठी सहा नवी केंद्रे

0

मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश

नवी दिल्ली : नीट 2018 परीक्षेसाठी यंदा 43 नव्या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. प्रथमच नीट परीक्षा देशातील एकूण दीडशे शहरांमध्ये पार पडणार. यामध्ये महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश आहे. आतापर्यंत देशात 107 केंद्रांवर नीट परीक्षा घेतली जात होती. आता महाराष्ट्रातील मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूर अशी नवी केंद्रे असणार आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली.

9 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार
नीट 2018 परीक्षा रविवारी 6 मेरोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. नीटसाठी राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर ही दहा केंद्रे होती. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते. 9 मार्चला रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे. परीक्षार्थींना त्यांच आधारकार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे.

येथे भरा अर्ज
नीटची परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना www.cbseneet.nic.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल. 1400 रुपये प्रवेश शुल्क (एससी, एसटी उमेदवारांसाठी 750 रुपये) आकारण्यात येईल. डेबिट/क्रेडीट कार्ड, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे हे पेमेंट करता येणार आहे. उमेदवार 17 ते 25 वर्ष वयोगटातील असावा. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 30 वर्ष आहे. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही नीटसाठी नोंदणी करु शकतात.