नीतीशकुमार पास, बहुमत सिद्ध!

0

पटणा : अगदी अपेक्षेप्रमाणे जनता दल (संयुक्त) व भारतीय जनता पक्षाच्या आघाडीने शुक्रवारी बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)त सहभागी झालेल्या एनडीएला 131 मते मिळाली तर विरोधातील राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आघाडीला 108 मते पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी 122 सदस्यांचा पाठिंबा हवा होता. त्यापेक्षा जास्त मते मिळाल्याने मुख्यमंत्री नीतीशकुमार यांची खुर्ची पक्की झाली आहे. एनडीएच्या पक्षात जनता दल (संयुक्त) 71 आणि भाजपचे 58 आमदार होते. तर दुसरीकडे, राजद 80 व काँग्रेसचे 27, डाव्या पक्षाचे तीन असे 110 आमदार होते. पैकी विरोधकांचे दोन मते फुटल्याचेही उघडकीस आले आहे. बहुमत प्रस्ताव जिंकल्यानंतर नीतीशकुमार यांनी राजदनेते तेजस्वी यादव यांच्यावर टीकास्त्र डागले. आम्ही ‘राजद’शी सत्तेसाठी आघाडी केली नव्हती. सत्ता भोगण्यासाठी नव्हे तर सेवेसाठी असते. बिहार भ्रष्टाचार व अन्याय सहन करणार नाही, असेही नीतीशकुमार यांनी ठणकावले. यावेळी सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्याचे पहावयास मिळाले.

भाजपचा एक आमदार गैरहजर
राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर अवघ्या 12 तासांमध्ये नीतीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी गुरुवारी सकाळी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी सरकार स्थापन करण्यासाठी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. आता नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या 14 जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी राजदकडे 80, जदयू 71, काँग्रेस 27 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे तीन जागा आहेत. या सर्व पक्षांची मिळून महाआघाडी तयार झाली होती. मात्र, नीतीश यांनी महाआघाडीतून बाहेर पडत भाजपशी संधान साधले होते. काल एनडीए युतीने राज्यपालांकडे सादर केलेल्या पत्रात त्यांच्याकडे 132 आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. यामध्ये जदयूच्या 71, भाजपच्या 53, आरएलएसपीच्या 2, एलजेपीच्या 2 आणि एचएएमच्या एका आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे आमदार भूषण पांडेय यांनी मतदान केले नाही. तो अपवाद वगळता जनता दलाचा दावा खरा ठरला.

विरोधकांनी मर्यादेत रहावे, नाही तर सर्वांना आरसा दाखविला जाईल, सभागृहातही आणि बाहेरही! सत्ता सेवेसाठी असते मेवा खाण्यासाठी नाही. भ्रष्टाचार आणि अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही. प्रत्येक अपमान सहन करून महाआघाडीचा धर्म निभावला. काँग्रेस 25 जागांच्या पुढे सरकत नव्हती. आता त्यांना 40 जागा आम्ही मिळवून दिल्यात. मला कुणीही धर्मनिरपेक्षतेचा पाठ शिकवू नये.
– नीतीश कुमार, मुख्यमंत्री बिहार

ज्या लोकांनी भाजपच्याविरोधात मतदान केले होते, त्यांच्या पाठीत नीतीशकुमार यांनी खंजीर खुपसला. चार वर्षांत त्यांनी चार सरकार स्थापन केले. त्यामुळे बिहारचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई कोण देणार? आम्ही गुप्त मतदानाची मागणी केली होती, ती का नाकारली?
– तेजस्वी यादव, नेते राष्ट्रीय जनता दल