नीतीशकुमार-मोदींची आज अग्निपरीक्षा!

0

नवी दिल्ली/पाटणा : बिहारमधील राजकीयनाट्य अखेर चोवीस तासांतील वेगवान घडामोडीनंतर संपुष्टात आले. नीतीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना भाजपने पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्रिपदी त्यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. महाआघाडीतून राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच, भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा व भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अनिल जैन यांची उपस्थिती होती. जनता दल (संयुक्त)चे संयोजक शरद यादव यांनी मात्र गैरहजेरी दर्शविली. नीतीशकुमार यांच्या निर्णयावर यादव तीव्र नाराज असून, त्यांनी आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह पक्षाचे खासदार अली अन्वर, वीरेंद्र कुमार यांनीही नीतीश यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शपथविधीनंतर नीतीशकुमार यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शुक्रवारीच विधानसभेचे विशेष सत्र बोलावून बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय नीतीशकुमार यांनी घेतला आहे. त्यामुळे नीतीश व मोदी यांची उद्या अग्निपरीक्षा ठरणार आहे.

बिहारच्या हितासाठी राजकीय निर्णय : नीतीशकुमार
नीतीशकुमार यांच्या एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयाचा पक्षाचे संयोजक शरद यादव यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. त्यामुळे त्यांनी गुरुवारच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. बुधवारी नीतीशकुमार यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस-राजद आणि जनता दल (संयुक्त) या महाआघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर तातडीने भाजपने नीतीशकुमार यांना पाठिंबा देऊन राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा दाखल केला. तो राज्यपालांनी मान्य करत, गुरुवारी सकाळी 10 वाजता नीतीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची तर भाजपनेते सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. आपण बिहारच्या हितासाठी हा राजकीय निर्णय घेतल्याचे यावेळी नीतीशकुमार यांनी सांगितले. दरम्यान, मंत्रिमंडळ समन्वय विभागाचे प्रधान सचिव ब्रजेश मेहरोत्रा यांनी सांगितले, की मुख्यमंत्री नीतीशकुमार व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी संक्षिप्त मंत्रिमंडळाचे दोन मसुदे तयार केले असून, पहिल्या मसुद्यानुसार, महाआघाडीच्या सरकारने 28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान बोलावलेल्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. तर दुसरा मसुदा हा शुक्रवारी विश्वासदर्शक ठराव मांडून तो जिंकण्याचा आहे. त्यासाठी शुक्रवारी विशेष अधिवेशन बोलावले जात आहे.

नीतीशकुमार यांनी धोका दिला : राहुल गांधी
स्वार्थासाठी लोकं काहीही करत आहेत. नीतीशकुमार यांनी आम्हाला धोका दिला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिली. नीतीश यांच्यासोबतची महाआघाडी फारकाळ चालणार नाही, याची जाणिव आपणास होती. हिंदुस्थानच्या राजकारणाची हीच मोठी समस्या आहे, की राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात, असेही खा. गांधी म्हणाले. दरम्यान, जनता दल (संयुक्त)चे संयोजक खा. शरद यादव यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्या भेटीचा तपशील हाती आला नाही. यादव यांच्यासह अनेक नेते नीतीशकुमार यांच्या निर्णयावर नाराज आहेत. सायंकाळी पाच वाजता या नेत्यांनी यादव यांच्या घरी बैठक घेऊन विश्वासमत दर्शक ठरावाच्यावेळी काय भूमिका घ्यायची याची रणनीती ठरविली. पक्षाचे महासचिव अरुण सिन्हा यांनीही कुमार यांच्या निर्णयाविरुद्ध आपली तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

कुणाकडे किती संख्याबळ
243 : एकूण सदस्य संख्या
122 : बहुमतासाठी आवश्यक संख्या
71 : जनता दल (संयुक्त)
53 : भाजप
08 : इतर नीतीशकुमार समर्थक
80 : राष्ट्रीय जनता दल
27 : काँग्रेस
04 : डावे पक्ष व इतर