पाटणा : बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासह काँग्रेसची महाआघाडी असलेले राज्य सरकार अखेर कोसळले आहे. उपमुख्यमंत्री तथा लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्री नीतीशकुमार यांना राजदनेतृत्वाकडून नकारघंटा मिळाल्यानंतर नीतीशकुमार यांनी स्वतःच राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची राजभवनावर भेट घेऊन आपला राजीनामा दिला. त्यामुळे महाआघाडीचे हे सरकार कोसळले आहे. नजीकच्या काळात भाजपसोबत आघाडी करून राज्यात सरकार स्थापन करण्याचा नीतीशकुमार यांचा इरादा असल्याची माहिती हाती आली आहे.
लालूंनी केलेली पुत्राची राखण भोवली!
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावरून राज्य सरकारमध्ये उभी फूट पडली होती. बुधवारी जनता दल (संयुक्त)च्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सरकार विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नीतीशकुमार हे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले व त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त केला. तसेच, सरकार विसर्जित करण्याची विनंती केली. राजीनामा दिल्यानंतर नीतीशकुमार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आपण नेहमीच आघाडी धर्माचे पालन केले. परंतु, अलिकडे ज्याप्रकारे वातावरण निर्माण झाले होते, त्या वातावरणात काम करणे आपणास शक्य नाही. राज्याच्या हितासाठी आपण सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील राजकीय वाटचालीबद्दल मात्र त्यांनी चुप्पी साधली. जेडीयूच्या बैठकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाची पक्षप्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर त्यांनी तेजस्वी यादव राजीनामा देणार नाहीत, असे नीक्षून सांगितले होते. त्यामुळे नीतीशकुमार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. भाजप हा नीतीशकुमार यांच्यावर जाळे फेकत असून, ते या जाळ्यात अडकले आहेत, असा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला होता.