सिधुदुर्ग : सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर मासेफेक केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नीतेश राणे यांच्यासह 24 जणांना मालवण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अटक केलेल्या सर्व जणांना कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली. मच्छिमारांच्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी आमदार राणे मत्स्य कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली होती. तसेच, यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते.
राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना बेकायदेशीर पर्ससीननेटच्या मासेमारीवर केव्हा कारवाई करणार? असा सवाल केला होता. पारंपरिक मच्छिमारांचे जीवनच धोकादायक स्थितीत असताना बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. 1 ऑगस्ट पासूनच्या नव्या मत्स्य हंगामात समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्स दिसून आल्यास ते पेटवून दिले जातील, असा इशाराही राणे यांनी दिला होता. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, रापण संघाचे पदाधिकारी दिलीप घारे, श्रमिक मच्छिमार संघाचे छोटू सावजी, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर, देवगड काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप साटम, आदी उपस्थित होते. पर्ससीन मासेमारी विरोधात सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना आमदार नीतेश राणे यांनी फैलावर घेतले होते. याप्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी राणे यांच्या अटकेची कारवाई केली.