नीरव मोदीच्या संपत्तीवर टाच; संपत्ती जप्त

0

नवी दिल्ली-पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेला व्यापारी नीरव मोदीला आज सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला. ईडीने नीरव मोदीच्या ६३७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

हाँगकाँगमधून २२. ६९ कोटी रुपयांचे दागिने व हिरे, दक्षिण मुंबईतील नीरव मोदीच्या बहिणीच्या नावावर असलेले १९.५ कोटी रुपयांचे घर ईडीने जप्त केले आहे. २०१७ मध्ये हे अलिशान घर खरेदी करण्यात आले होते. नीरव मोदीची बहिण पुर्वी मोदी व तिच्या पतीच्या सिंगापूरमधील कंपनीचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. यात सुमारे ४४ कोटी रुपये आहेत. तसेच अन्य पाच बँक खातीही गोठवण्यात आली असून यात २७८ कोटी रुपये आहेत. याशिवाय लंडनमधील ५६. ९७ कोटी रुपये आणि न्यूयॉर्कमधील २१६ कोटी रुपयांची दोन घरंही जप्त करण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी, त्याची अमेरिकी पत्नी अमी मोदी, बेल्जियन नागरिक असलेला भाऊ निशाल मोदी व मामा मेहुल चोकसी यांच्यासह अन्य कर्मचारी व बँकेचे अधिकारी आरोपी आहेत. मुंबईतील सीबीआय न्यायालयात नीरव मोदी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून काही महिन्यांपूर्वी सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.