नीरा कालव्याच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात

0

निमगाव केतकी । निमगाव केतकी शाखेअंतर्गत नीरा डावा कालव्यातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ व सायफन काढून कालवा स्वच्छ करण्याचे काम अंतिम अप्प्यात आले आहे. या कामामुळे कालव्याचा मंदावलेला प्रवाह वाढणार आहे. शिवाय कामामुळे पाण्याची गळती कमी होऊन नियोजनाप्रमाणे आवर्तन देणे सोयीचे होणार असल्याची माहिती निमगाव केतकी पाटबंधारे शाखा क्रमांक दोनचे अभियंता आर. डी. झगडे यांनी दिली.

झाडेझुडपांमुळे पाण्याला अडथळा
कालव्यात अनेक दिवसांपासून झाडेझुडपे व गाळ वाढल्यामुळे पाण्याला अडथळा निर्माण होऊन प्रवाह मंदावला होता. अडथळ्यांमुळे पाण्याची गळतीही वाढली होती. त्यामुळे आवर्तन काळात वेळेवर पाणी पोहचत नसल्याने आवर्तनाचा कालावधी वाढत होता. आता या कामामुळे तो कमी होईल. शेटफळ फिडींग तसेच लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे व उपविभागीय अधिकारी आर. के. घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिकी विभागाच्या मशिनद्वारे कालवा स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे.

दोन मशिनद्वारे काम सुरू
निमगाव केतकी कार्यक्षेत्रातील नीरा डावा कालवा किलोमीटर क्रमांक 146 ते 153 पर्यंतचे काम मागील एक महिन्यापासून दोन मशिनद्वारे सुरू आहे. आता ते अंतिम टप्प्यात आहे. हे काम संपल्यानंतर वितरिका क्रमांक 59 चे काम सुरू करण्यात येणार आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई चोखपणे पार पाडत असल्याचेही झगडे यांनी सांगितले.