भुसावळ । राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्लच्या शोधासाठी कानपूरातील सुभाष चिल्ड्रन होम या स्वयंसेवी संस्थेने पोस्टर्स तयार केले असून सोशल मिडीयासह शहरातील पोलीस ठाण्यांसह बसस्थानक व रेल्वे स्थानकावर ते लावून नागरिकांना नीलेशबाबत आवाहन करण्यात आले आहे. नीलेशचा भाऊ गणपतने आधी नीलेश कानपूरापर्यंत सोबत असल्याची माहिती दिल्यानंतर आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र त्याच्या माहितीत विसंगती आढळत असल्याने तपास कार्याला अनेक अडचणी येत आहेत तर मुक्ताईनगरातील पोलिसांचे पथक शनिवारी परतीच्या प्रवासाला निघाले आहे. 24 जुलै रोजी कानपूरच्या सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी गणपत भिल्ल यास ताब्यात घेतले होते व त्याची रवानगी शहरातील चिल्ड्रन होममध्ये केली होती. यानंतर पदाधिकार्यांनी मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पथकाने त्यास दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला गणपतने भाऊ नीलेशही 24 जुलैपर्यंत आपल्या सोबत कानपूर रेल्वे स्थानकावर कचरा तसेच भंगार वेचत असल्याची माहिती दिली होती मात्र नंतर त्याने भावाला एका रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले व आपण मात्र गाडीत बसून संपूर्ण दिवस प्रवास करीत कानपूरात पोहोचल्याचे सांगितल्याने नीलेशचा शोध घेण्यात अडचणी वाढल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील 32 जिल्ह्यात नीलेशचा शोध
नीलेश भिल्ल कानपूरात असल्याच्या शक्यतेनंतर सुभाष चिल्ड्रन होमच्या पदाधिकार्यांनी शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, पोलीस ठाण्यांमध्ये नीलेशच्या छायाचित्राचे पोस्टर्स लावून तो आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या संस्थेचे पदाधिकारी विनयकुमार ओझा म्हणाले की, नीलेशचा शोध सुरू करण्यात आला असून उत्तरप्रदेशातील 32 जिल्ह्यांमधील चिल्ड्रन सोसायटीच्या ग्रुपवरही त्याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. शहरात जागोजागी आम्ही त्याच्या छायाचित्राचे पोस्टर्स लावत आहोत.