नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत

0

जळगाव । शहरातील जिल्हापेठ भागातील जानकीनगर परिसरात असलेल्या तुकारामवाडी येथे गुरुवारी आग लागल्याने 16 घरे जळून खाक झाली होती. आगीत संपूर्ण घरे जळून खाक झाली असल्याने कुटुंबीय उघड्यावर आले आहे. आगीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून प्रत्येकी पाच हजाराची मदत देण्यात आली आहे. जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आगग्रस्तांची भेट घेऊन त्यांची सात्वन करत मदतीचे धनादेश सोपविले. सुरुवातीला प्रातिनिधीक स्वरुपात उमाकांत महाजन, प्रभाकर महाजन, ज्ञानेश्‍वर चौधरी, फकीरा चौधरी, वेडाबाई मराठे आदी पाच जणांना मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, तहसिलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

रात्र काढली जागुन
गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आल्यानंतर येथील रहिवाश्यांनी जळूून खाक झालेल्या घरांमध्ये जावून काही जीवनावश्यक वस्तु शिल्लक आहेत की, नाही या आशेने घरांमध्ये शोध केला होता. तसेच अवघ्या एका तासाच्या आगीमुळे सर्वस्व हरवुन बसलेल्या रहिवाश्यांनी रात्र हरविलेल्या संसाराच्या आठवणींमध्ये जागुन काढली. आपल्या आई-वडिलांच्या चेहर्‍याकडे पाहून अनेक चिमुकलेही रात्रभर झोपले नसल्याची माहिती रहिवाश्यांनी दिली.

दिवसभर चूल पेटले नाही
आगीत खाक झालेल्या कोळशाच्या ढिगार्‍यातुन विखुरलेल्या काही वस्तु, साहित्य व आठवणींना शोधण्याचा प्रयत्न येथील नागरिक शुक्रवारी करताना दिसून आले. या आगीत सर्व गमावलेल्या कुंटुबियांना आधार देण्यासाठी शहरातील अनेक समाजिक संस्था, नागरिक पुढे सरसावल्याने, माणुसकीचे दर्शन जानकीनगर परिसरात पहायला मिळाले. विशेषःबाब म्हणजे जानकीनगर भागात एकाही घरी चूल पेटले नाही.

नातेवाईकांकडे मुक्काम
अनेक संसार उध्वस्त झाल्याने येथील रहिवाश्यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात करण्यात आली होती. तसेच जानकीनगरातील काही रहिवाश्यांनी पिडीत कुंटुंबियांची आपल्याकडेच राहण्याची व्यवस्था केली होती. काहींनी आपल्या नातेवाईकांकडे जावून रात्र काढली. तर अनेकांनी रात्रभर जळालेल्या घरांकडे एकटक पाहून आपली रात्र काढल्याची माहिती पिडीत कुंटुंबियांनी दिली.

युवाशक्ती तर्फे भांडी वाटप
शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी येथल रहिवाश्यांसाठी मदतीचा हात पुढे केल्याचे दिसुन आले. युवाशक्ती फाउंडेशन, निस्वार्थ सेवा प्रतिष्ठान, रेडक्रॉससह अनेक सामाजिक संस्थाच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी जावून कपडे व जेवनाची व्यवस्था केली होती. तर काही युवाशक्ती फाउंडेशनकडून येथील रहिवाश्यांना भांडी दिली. यासह अनेक नागरिकांनी देखील वैयक्तिक मदत करून येथील रहिवाश्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.