मुक्ताईनगर : मतदारसंघातील रावेर, बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसला. यात हजारो हेक्टरवरील केळी व इतर पिकांसह, घरांचीही पडझड मोठ्या प्रमाणावर झाली. यापैकी मेंढोळदे गावात तर पाचशेच्या वर घरांची पडझड झाल्याने पूर्ण गावाच उद्ध्वस्त झाले. ध्यंतरी शासनातर्फे याआधीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकर्यांना मदत स्वरूपात लाभ देण्यात आला होता परंतु मार्च ते मे 2021 अखेर झालेल्या प्रचंड नुकसानीची दमडीही शेतकरी व नुकसानग्रस्तांना मिळाली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीकात प्रचंड नाराजी पसरून शासनाच्या तसेच लोकप्रतिनिधी म्हणून चक्क माझ्यावरच ते आरोप करीत असून यासंदर्भात संबंधितांना सरकार नुकसान भरपाई देणार की नाही ? असा खडा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथील दोन दिवसीय सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाच्या कामकाजात उपस्थित केला. या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी उवरिीत मदतीची रक्कम लवकरच देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.