नुकसानीच्या भरपाईचा १७६ कोटींचा प्रलंबीत मदत निधी मिळणार
पालकमंत्र्यांची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मंजूर
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळी वारे व पूर परिस्थितीमुळे पीकांच्या झालेल्या नुकसानीसह घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी आदींसाठीचे ७४ कोटी ८८ लक्ष रूपये तर २०१७ पासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पोटी प्रलंबीत असणार्या १०२ कोटी ९ लक्ष रूपयांच्या मदत निधीचा मुद्दा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकर्यांना तब्बल १७८ कोटी रूपयांचा मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच अनुदान प्राप्त होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत माहिती अशी की, २०२१ मध्ये झालेला अतिवृष्टी, वादळी वारे व पूर परिस्थितीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. यात जानेवारी ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ३ कोटी ४३ लक्ष रूपयांचे अनुदान मिळाले असून ६७ कोटी ५७ लाख रूपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबीत आहे. तर यंदाच झालेल्या अतिवृष्टीमुळे पीकांच्या झालेल्या नुकसानीसह घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी आदींसाठी ७ कोटी ३१ लाख रूपयांची मदत बाकी आहे. यासोबत २०१७ च्या खरीप हंगामापासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या हानीचे अनुदान अद्यापही प्रलंबीत आहे. यात २०१७ च्या खरीप हंगामात ११ कोटी ७० लाख रूपयांची मदत बाकी आहे. २०१८च्या खरीप हंगामातील ५० कोटी ७३ लक्ष रूपयांची मदत अद्याप बाकी आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९ मध्ये आलेल्या क्यार हा महा चक्री वादळामुळे झालेल्या हानीपोटी अद्यापही ४ कोटी ३३ लक्ष रूपयांची मदत बाकी आहे. जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीपोटी ३५ कोटी ३१ लक्ष रूपयांची मदत अजून बाकी आहे. अशा प्रकारे यंदाचे ७४ कोटी ८८ लक्ष आणि २०१७ ते २०२० च्या दरम्यानच्या नुकसानीचे १०२ कोटी ९ लक्ष रूपये अशा एकूण १७६ कोटी ९७ लक्ष रूपयांच्या मदतीचा मुद्दा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला. यावर चर्चा होऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळाने आजची बिकट स्थिती लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यास हा मदतनिधी तातडीने प्रदान करण्याचे निर्देश दिले.