मुंबई (निलेश झालटे) : हवामान आधारीत पीक विम्यासाठी राज्यातील सर्व स्वयंचलित हवामान केंद्रांची तपासणी करुन यापुढील काळात कृषी आणि महसुल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्पॉट पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरीत केली जाईल, अशी घोषणा कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी विधानसभेत केली.
नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादकांना पीक विमा परताव्याची रक्कम न मिळाल्याबाबतचा तारांकीत प्रश्न विधानसभा सदस्य सुभाष साबणे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फुंडकर बोलत होते. नांदेड जिल्ह्यातील 5 हजार 307 शेतकरी पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नुकसान भरपाईस पात्र ठरत नसल्याने या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. या संदर्भात पीक विमा कंपनीचे अधिकारी आणि आयुक्त यांची संयुक्त बैठक घेऊन यासंदर्भात चौकशी करुन अहवाल तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सन 2017-18 च्या खरीप हंगामापासून पीक विम्यामध्ये पीक निहाय समावेश करण्यात येईल, आणि नुकसान भरपाईचा पंचनामे करताना महसूल, कृषी आणि पीक विमा कंपनीचे अधिकारी एकत्र प्रत्यक्ष पाहणी करतील, असेही फुंडकर यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यात हवामान आधारीत पीक विमा योजनेच्या सन 2015-16 मधील 8 हजार 188 शेतकऱ्यांनी 69.93 कोटी विमा सुरक्षीत रक्कम भरली होती. हवामान केंद्राच्या अंदाज आकडेवारीनुसार 2 हजार 881 शेतकऱ्यांना केळी पिकासाठी 3.25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित 5 हजार 307 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या संदर्भात समिती गठित करुन चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेतील उत्तरात सांगितले.
उपप्रश्नाला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, सन 2015-16 मध्ये 17 महसूल मंडळामध्ये पिक विमा भरण्यात आला होता. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या 8 मंडळामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला आणि 9 महसूल मंडळात पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. या संदर्भात आयुक्त, पीक विमा कंपनीचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या पीक नुकसान संदर्भात हवामान अंदाज केंद्रानुसार अहवाल देण्यात यावा, तसेच सर्व हवामान अंदाज केंद्र सुरु होती का याचा तपास घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे खोत यांनी सांगितले. आ. योगेश सागर यांनी पिक विम्यासाठी लवाद नेमून कंपन्याकडून अनामत रक्कम घ्यावी अशी सूचना केली. तर आ. हरिभाऊ जावळे यांनी स्पॉट पंचनामे व नुकसानभरपाईचे पैसे थेट शेतकाऱ्यांच्या सेव्हिंग खात्यात जमा करण्याची सूचना केली. यावेळी चर्चेत विधानसभा सदस्य हरिभाऊ जावळे, जयप्रकाश मुंदडा, हेमंत पाटील, योगेश सागर, चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला होता.