ठाणे । ठाण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखने दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल बुध्दिबळ स्पर्धेत 20 वर्ष गटात सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे या गटात नुबैरशाहने ग्रांडमास्टर आणि अव्वल मानांकन मिळालेल्या शार्दुल घागरे आणि सिद्धांत महापात्राला मागे टाकून हे यश मिळवले. याशिवाय वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या नुबैरशाहने सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधणार्या अभिजीत गुप्ताला बरोबरीत रोखले होते. स्पर्धेच्या पहिल्या दोन फेर्या नुबैरशाहने सहज जिंकल्या.
सिद्धांतशी बरोबरी
तिसर्या फेरीत नुबैरशाहसमोर सिद्धांतचे आव्हान होते. सिद्धांतने पांढर्या सोंगट्यानी इ 4 पद्धतीने डावाची सुरुवात केली. त्याला नुबैरशाहने बोट विनिंग पद्धतीने उत्तर दिले. मधल्या खेळात नुबैराहला विजयाची संधी होती. पण पटावरील परिस्थती पाहून सिद्धांतने बरोबरी मान्य केली. सात फेर्यांच्या स्पर्धेत पाचव्या फेरीत नुबैरशाहचा सामना ग्रांडमास्टर शार्दुल गागरेशी झाला.
ग्रँन्ड मास्टर शार्दुल गागरेलाही रोखले
नुबैरशाहने पांढर्या सोंगट्यानी खेळताना निमो 20 इंडियन पद्धतीने डावाची सुरुवात केली. या सामन्यातही नुबैरशाहला बरोबरी मान्य करावी लागली. पाचव्या फेरीअखेर नुबैरशाह, शार्दुल आणि सिद्धांत चार गुणासह संयुक्तरीत्या चारगुणासह आघाडीवर होते. सहाव्या फेरीत सिद्धांत पराभूत झाला. शार्दुलने हि फेरी जिंकली तर नुबैरशाहची लढत बरोबरीत सुटली. त्यामुळे या फेरीअखेर शार्दुलने पाच गुणासह नुबैरशाहवर अर्ध्या गुणाची आघाडी मिळवली होती. निर्णायक सातव्या फेरीत शार्दुलची लढत बरोबरीत सुटली. तर नुबैरशाहने श्रीलंकेचा राष्ट्रीय विजेता डी. एम. संजुलाचा पराभव करत गुणसंख्येत शार्दुलशी बरोबरी साधली. दोघांचेही साडेपाच गुण झाल्याने सरस टायब्रेकच्या आधारावर नुबैरशाहला विजेता घोषित करण्यात आले. इंडियन ऑईलची क्रीडा शिष्यवृत्ती मिळालेला नुबैरशाहाने वरिष्ठ गटात अभिजित वर्माला बरोबरीत रोखले होते.