नंदुरबार- काकर्दे येथील शेतकऱ्यांचा गहू गारपिटीने पूर्णपणे उध्वस्त केला आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. तालुक्यातील काकर्दे सह परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा हे पीक घेतले होते. काही दिवसात हे पीक काढणीला आले होते. असे असतानाच नंदुरबार परिसरात झालेल्या वादळी आणि गारपीट पावसाने या पिकांचे पूर्णता नुकसान केले आहे. काढणीला आलेला गहू पूर्ण आडवा पडला असून कापणी केलेले हरभरे देखील वादळी वाऱ्याने उडून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीचा महसूल विभाग आणि कृषी विभागाने पंचनामा करून नूकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी अशी मागणी काकर्दे येथील शेतकरी फारुख कुरेशी, हरी भापकर, यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहेत