नृत्यकला निकेतनतर्फे रंगला ‘स्वर-तरंग’

0

भुसावळ । संगीत नृत्य कला निकेतन आयोजित स्वर तरंग हा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित मराठी हिंदी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन रामचंद्र चौधरी यांच्या हस्ते झाले. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप नाईक व उपाध्यक्ष डॉ. अलका नाईक तसेच उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन डॉ. एन.एस. आर्वीकर व कल्याणचे गणेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

लयबध्द गाण्यांनी भारावले रसिक
संस्थेच्या संचालिका अनिता पाटील यांनी प्रास्तविक केले. सुरुवातीस 24 विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. नंतर एकूण 25 विद्यार्थ्यांनी सिन्थेसाइझरवर विविध गीते सादर केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिलांचा राग एक रंग अनेक या अनोख्या कार्यक्रमास रसिकांनी भरभरून दाद दिली. कल्याण थाटातील यमन रागाची सखी येरी आली पियाबिन ही तीन तालातील बंदिश सर्व 15 महिलांनी एकत्रित सादर केली. या संपूर्ण कार्यक्रमात तबल्यावर सिद्धेश माळी, हिमांशू व तेजस मराठे तर ढोलकीवर अनुराग शर्मा व देवेंद्र ठाकूर हर्मोनिअम व सिन्थेसाइजरवर अभिनव राऊत व विपुल घुले यांनी सुंदर साजेशी साथ संगत दिली. कला निकेतनच्या 51 विद्यार्थ्यांनी एकाचवेळी सिन्थेसाइजरवर टिक टिक वाजते डोक्यात हे गीत व राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन अनिता पाटील यांनी केले होते. प्रा. राजश्री देशमुख हिने सूत्रसंचालन केले. भुसावळकर रसिकांनी या कार्यक्रमास भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील माळी, सुधा आनंद राशातवार, देवेंद्र ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.