पिंपरी : नृत्यकला मंदिर संस्थेतर्फे भरतनाट्यमवर अधारीत नृत्यांजली 2018 या कार्यक्रमात 115 विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष दिलीप सिंह मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कलर्स मराठी वरील तु माझा सांगाती फेम गायीका व अभिनेत्री सायली सांभारे, नृत्यकला मंदिरच्या संचालिका तेजश्री अडिगे, ज्येष्ठ मार्गदर्शक व्या.टी. रत्नम, प्रशिक्षीका नमिता तळेकर, लायन्स क्लबच्या अॅड. शोभा कदम, जयश्री मांडे, जयंत मांडे, कांतीलाल मुनोत, अविनाश वाळके आदी उपस्थित होते. यावेळी गणपती किर्तनम या गणपती स्तुती मृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या सत्रात 2 वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यमचा मूळ गाभा असणारे ‘अडवू’ या नृत्यप्रकाराने सुरुवात केली. सुमारे 40 विद्यार्थीनींनी हे सादरीकरण केले. त्यानंतर तीन वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थिनींनी ‘गितम’ ही रचना सादर केली. तसेच अलरीपू ही तिश्रएकम तालात सादर केली.
चौथ्या वर्षातील विद्यार्थिनींनी सरस्वती मातेच्या विविध रुपाचे वर्णन करणारी सरस्वती रागातील व रुपकातील सरस्वती कौतुकम ही रचना सादर केली. तर पंतुवरळी आणि ताल अदितालात असणारी अभिनयाची आणि नृत्याची कस लावणारी वर्णम ही रचना पाचव्या वर्षातील विद्यार्थिनींनी सादर केली. शेवटच्या म्हणजेच सहाव्या वर्षातील विशारद कोर्स करत असलेल्या विद्यार्थीनींनी अभिनय पद व तिल्लाना या रचना सादर केल्य. अभिनय पदात शिवानी त्रिपुरा सुराचा वध केलेली अद्भुत अधारीत रचना सादर करुन भऱतनाट्यम मार्गम मधील शेवटचा टप्पा असलेली जलद गतीचा स्त्रोत असणारी तिल्लाना ही रचना सादर केली. तर कार्यक्रमाचा शेवट मंगलम या रचनेने करण्यात आला. यावेळी वर्षभरात यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार कऱण्यात आला.
कार्यक्रमासाठी साथसंगत गायक म्हणून एन.शिवप्रसाद, वायलीन वादन नारायणरमा, मृदुंग एच. व्यंकटरमण, बासरी संजय शाशीधरण यांनी साथ संगीत केली. गुरु तेजश्री अडिगे यांनी सर्व नृत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहकार्य नमिता तळेकर, प्राजक्ता चंद्रात्रे, गौरी घाडगे यांनी केले तर संयोजन प्रशांत शिंदे, सतिश मेंढके, ऋतुजा ठोंबरे,गंधाली शिंदे यांनी केले व सूत्रसंचालन दिक्षा भांडारकर यांनी केले.