नृत्याविष्कारांनी ओसंडला बालदिनाचा उत्साह!

0

पुणे । पारंपरिक तसेच विविध राज्यांच्या लोकसंगीतावर आधारीत नृत्यांसह विविध रंगी वेशभूषा, लोकसंगीताबरोबरच देशभक्ती, पौराणिक तसेच चित्रपट गीतांवर आधारित नृत्यांसह चिमुकल्यांनी बालदिनानिमित्त जल्लोष केला.निमित्त होते; दैनिक जनशक्ति व लायन्स क्लब ऑफ पुणे स्मार्ट सिटीतर्फे आयोजित आंतर शालेय नृत्य स्पर्धेचे! मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना व्यासपीठ मिळावे, यासाठी मंगळवारी गणेश कला क्रीडा मंच येथे ‘जल्लोष 2017 आंतर शालेय नृत्य स्पर्धा’ घेण्यात आली. स्पर्धेचे दीपप्रज्ज्वलन जनशक्तीचे मुख्य संपादक कुंदन ढाके, उपमहापौर डॉ, सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते झाले.

गणेश वंदना व सुप्रभात गाण्यावर नृत्य
कार्यक्रमाला नृत्यविशारद अर्चना पटवर्धन यांच्या गणेश वंदना नृत्याने सुरुवात झाली. यानंतर विशेष सहभाग म्हणून गोळवलकर गुरुजी प्राथमिक शाळेच्या सुप्रभात गाण्यावरील नृत्याने झाली. या स्पर्धेनिमित्त शहरातील बावीस प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुला-मुलांनी सहभाग घेतला. बालदिनाच्या या कार्यक्रमात लहानांसोबत मोठ्यांनीही आनंद लुटला. मुलांमधील निरागसता, चैतन्य, औत्सुक्य, मुलांमध्ये दडलेल्या कलागुणांची एक वेगळी अनुभूती यानिमित्ताने पाहायला मिळाली. पौराणिक गीतरामायण, गोंधळ, बंगाली, राजस्थानी, तसेच विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यांसह चित्रपट गीतांतील नृत्यांवर शालेय विद्यार्थ्यांनी रोमहर्षक नृत्ये सादर करून उपस्थित शिक्षक, पालक आणि पाहुण्यांची मने जिंकली.

या नृत्यस्पर्धेच्या कार्यक्रमासाठी जनशक्तिचे महाव्यवस्थापक हुनमंत बनकर, व्यवस्थापक अनिल शिंदे, वितरणप्रमख सुनिल महापुरे, वितरण अधिकारी विशाल भिंगारदिवे, आदेश ठिबे, निलेश भोसले, गजानन कदम, रिंकेश जैन, दर्शन कोलेकर, निखिल पवार, अनिल दळवी तसेच इतर पदाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. परिक्षक म्हणून निकीता मोघे, अर्चना पटवर्धन आणि अभ्यंग कुवळेकर यांनी काम पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली कांबळे यांनी केले.

प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे विजेते
एमईएस रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या बंगाली लोकनृत्याला प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे रोख पारितोषक आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर गोळवलकर गुरुजी माध्यमिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुजराती लोकनृत्य सादर करून द्वितीय क्रमांकाचे सात हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह पारितोषिक पटकावले. नूमवि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सादर केलेल्या नृत्याला तृतीय क्रमांकाचे पाच हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे पारितोषिक मिळाले. डीएसके हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘खंडोबा जागरण नृत्य’ आणि भारत इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘खेळ मांडला’ गाण्यावरील नृत्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उत्तम वेशभूषेसाठी कॅम्प एज्युकेशन कन्या शाळेला व उत्कृष्ट मनोरंजनासाठी आगरकर मुलींचे हायस्कूलला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

वैशिष्टपूर्ण नृत्यासाठी नवीन मराठी शाळेला बक्षीस
जनशक्तिच्यावतीने स्पर्धेतील वैशिष्टपूर्ण नृत्यासाठी नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गीत रामायणावर’ आधारित नृत्यासाठी 5 हजारांचे बक्षीस देण्यात आले. या नृत्यामध्ये तब्बल 95 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

पुढील वर्षी 50 शाळा असतील
लायन्स क्लब ऑफ पुणेचे रमेश शहा म्हणाले, जनशक्ति समाजिक कार्यासाठी उत्सुक असल्यानेच त्यांनी समाजकार्यात सतत सक्रिय असणार्‍या लायन्स क्लबबरोबर एकत्र येत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी कार्यक्रमात 20 शाळा सहभागी झाल्या आहेत. मी शब्द देतो की, पुढील वर्षी पन्नास शाळा या कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी रमेश शहा यांनी पर्यावरणाशी निगडीत लायन्स क्लबच्या उपक्रमाला पुणे महापालिकेन सहकार्य करावे, असे आवाहन केले. डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. जनशक्तिचे मुख्यसंपादक कुंदन ढाके यांनी उपस्थित शेकडो मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेत सहभागी शाळा
बाबुराव सणस कन्या शाळा (राजस्थानी नृत्य), आदर्श विद्यालय गर्ल्स हायस्कुल (खंडोबा गोंधळ नृत्य), कॅम्प एज्युकेशन सोसायटी (काठी न घोंगडं गाण्यावर नृत्य), एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक शाळा (बंगाली नृत्य), शारदा विद्यालय (गोंधळ नृत्य) रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय (गंगळागौर नृत्य), हिरामण बनकर हायस्कूल (हिंदी चित्रपट गीतवार नृत्य) .
एमईएस रेणुका स्वरूप मेमोरियल हायस्कूल (बंगाली लोकनृत्य) विद्यावर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूल (मारवाडी लोकनृत्य) डीएसके विश्‍व हायस्कूल (जागरण नृत्य) कॅम्प एज्युकेशन सोसाटी कन्या शाळा (गरबा नृत्य) नूमवि मुलांची शाळा (शेतकरी प्रश्‍नांवर आधारित नृत्य) एमईएस बॉईज हायस्कूल- भावे हायस्कूल (आदिवासी लोकनृत्य) गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय (गुजराती लोकनृत्य) आगरकर गर्ल्स हायस्कूल (मंगळागौर नृत्य) सुशिलाबाई विरकर हायस्कूल (गुजराती लोकनृत्य) राजा धनराज गिरजी हायस्कूल (जागरण नृत्य) भारत इंग्लिश स्कूल (‘खेळ मांडला’ गीतावर नृत्य).