नॅपकिन डिस्पोजेबल खरेदीचा आकडा फुगवला

0

पुणे । शहरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालय आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी जमा होणार्‍या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा पंधरा क्षेत्रीय कार्यालयात 35 ठिकाणी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने तयार केलेले 13 कोटी 89 लाख रुपयाचे पूर्वगणनपत्रक फुगवला असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी केला आहे.

शहरात दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी 650 टन घरगुती कचरा महापालिकेच्या कचरा वेचकांकडून उचलला जातो. या कचर्‍यामध्ये 3 टक्के म्हणजे तब्बल 20 टन कचरा हा सॅनिटरी वस्तूंचा असतो. त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन, लहान मुलांचे डायपर्स या कचर्‍याचा समावेश असतो. वापर झाल्यावर या सॅनिटरी वस्तू थेट कचर्‍यात फेकल्या जातात. या कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्याने सॅनिटरी नॅपकिन हे सध्या कचर्‍याच्या डब्यात, स्वच्छतागृहात, नाल्यात व उघड्यावर पडतात. त्यामुळे ओला कचरा प्रदूषित होतो, त्याचे विघटन होत नाही आणि तेथे जंतूंची वाढ होते. 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत उपलब्ध होणा-या विविध जागांवर 35 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल यंत्रणा उभारणे, सर्वेक्षण करणे, मुलींना व महिलांना, जनजागृती करून सदर युज/ वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचे कलेक्शन करण्याचे काम करावे लागणार आहे.

पर्यावरणाला धोका
विघटनाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने कचरा वेचकांना हा कचरा उघड्या हाताने वर्गीकृत करावा लागतो. परिणामी कचरावेचकांचे आरोग्य आणि पर्यावरणालाही धोका पोहोचतो. त्या पाश्‍वभूमीवर सॅनिटरी कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी प्रभागनिहाय सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल युनिट्स बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी अंदाजपत्रकातून 5 कोटींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयातही 35 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने निविदा काढली आहे.

साडेचार कोटींची कामे
15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत उपलब्ध होणार्‍या जागांवर साठवणूक करणे आणि सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजेबल यंत्रणेपर्यंत स्वतःच्या वाहनातून वाहतूक करून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामाचा समावेश आहे. या निविदेसाठी संबंधित ठेकेदारने गेल्या तीन वर्षात साडेचार कोटींची कामे केल्याची वर्कऑर्डर असणे आवश्यक आहे. वार्षिक उलाढाल 2 कोटी आणि पाच मशीन बसविले असल्याचा अनुभव असावा. मात्र या निविदेमधील अटीशर्ती ठराविक ठेकेदाराला मिळाव्यात याच उद्देशाने टाकली असल्याचा दावा नाना भानगिरे यांनी केला आहे.