नॅशनल वॉटर लिटरसी मिशन स्थापन करा

0

पुणे । जलबिरादरी आणि कर्नाटक जल संपदा विभाग आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय जलसंमेलनाचा शुक्रवारी विजापूर येथे समारोप झाला. ‘नॅशनल वॉटर लिटरसी मिशन’ स्थापन करा, नद्यांना प्रदूषण, अतिक्रमणांपासून वाचवा, पाणीवाटपाचे वाद न्यायालयाबाहेर जलसंसदेत सोडवले जावेत, त्यासाठी जलसंसदेची स्थापना व्हावी अशा मागणी पत्र यावेळी सर्वसंमतीने मान्य करण्यात आल्या. नीती आयोग, भारत सरकार, राज्यांच्या विधानसभा येथे या मागणी पत्रावर चर्चा व्हावी, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्रसिंह यांनी यावेळी केले. नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी राज-समाज-शासन यांनी एकत्र यावे, देशाला दुष्काळ-पूर मुक्त करावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

जलसंपत्ती ही राष्ट्र संपत्ती
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, जलसंपत्ती ही राष्ट्र संपत्ती आहे. तिची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सर्व प्रकारे, सर्व क्षेत्रांना पाणी लागते, म्हणून कर्नाटकने जलस्रोतांचे पुनरुज्जीवन कार्यक्रम प्राधान्याने सुरू केला आहे. डॉ. राजेंद्रसिंह, जलबिरादरी आणि भारतभरातील जलयोद्धयांनी या कामाला संमेलनाच्या निमित्ताने भेट दिली, ही महत्त्वपूर्ण बाब आहे.

बोधनकर यांना ’जलऋषी’ पुरस्कार
या संमेलनाला तीन राज्यातील 15 हजारांहून अधिक ‘जल योद्धे’ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विनोद बोधनकर यांचा ’जलऋषी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. क्रिकेटर राजश्री गायकवाड यांनाही सन्मानित करण्यात आले. जलसंपदा मंत्री डॉ. एम. बी. पाटील, कुडल संगम स्वामी, आ. प्रशांत परिचारक, आयोजक डॉ. राजेंद्र पोदार, बसवराज मृत्युंजय स्वामी, अभिनव मृगेंद्र स्वामी, किशोर धारिया उपस्थित होते. 101 जल साक्षरता यात्रांमधून आलेल्या देशभरातील जलकलशातील जल पूजन करण्यात आले. आमदार परिचारक यांनी विठ्ठल मूर्ती देऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सन्मानित केले. महाराष्ट्रातील ‘यशदा’मधील जलसाक्षरता केंद्राप्रमाणे राष्ट्रीय जलसाक्षरता अभियान संपूर्ण देशात राबविण्यात यावे, असेही यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले.