पिंपरी-चिंचवड : स्थलांतरीत व स्थानिक युवकांची विविध कारणांमुळे होत असलेली घुसमट जाणून घेऊन, युवकांचे नैराश्य, त्यांचा संघर्ष, खडतर प्रवास व क्षमता ओळखून युवकांनी गगनभेदी भरारी घेण्यासाठी बहुआयामी युवक विकासाच्या उद्देशाने सुरू केलेली ‘नेटवर्क फॉर युथ’ ही सामाजिक संस्था युवकांच्या जडणघडणीत मैलाचा दगड ठरली आहे. डॉ. राम गुडगिला यांच्या चिंचवडमधील सामाजिक संस्थेने युवकांसोबत जीवन कौशल्यावर काम करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षण, वैद्यकीय, विधी, समाजसेवा, समुपदेशन या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विचारधारेने मिळून ही संस्था सध्या सुरू आहे.
युवक, पालकांना तांत्रिक प्रशिक्षण
सध्याच्या युगात पौगंडावस्थेपासून तर अगदी प्रौढ वयापर्यंत सर्व तरूण पिढीला ताण-तणाव आणि दैनंदिन जीवनात येणार्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बदलती सामाजिक परिस्थिती, तसेच आधुनिक तंत्रज्ञान, छोटे कुटुंब, वाढती बेरोजगारी, वाढती स्पर्धा यामुळे युवकांचे नैराश्य वाढत चालले आहे. त्याचबरोबर आर्थिक, शैक्षणिक व इतर अडचणींवर मात करत युवक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. यातूनच विषम परिस्थितीला सामोरे जाताना, व्यक्तीमधली उमेद जागृत ठेवण्यासाठी नेटवर्क फॉर युथ ही संस्था युवकांना, पालकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याचे काम शहरात करत आहे.
तज्ज्ञांमार्फत सखोल मार्गदर्शन
सध्या पुणे, बीड, लातूर, धुळे, जळगाव, अमरावती, सोलापूर, सांगली, नागपूर आदी भागातून 550 च्यावर युवक या संस्थेशी जोडले गेले आहेत. या युवकांसाठी विविध कार्यक्रम राबवून त्यांना उत्साहीत करण्याचे काम संस्था करीत आहे. युवकांमधील मरगळ झटकून त्यांना दिशा देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. मुलांमधील निर्णय क्षमता, स्वत:ची ओळख, क्षमता, दैनंदिन ताणतणावाचे व्यवस्थापन, शैक्षणिक कौशल्य तसेच ग्रामीण भागातून आलेल्या युवकांचा वाढता एकलकोंडेपणा, विभक्त कुटुंब पद्धती या सारख्या विविध विषयावर तज्ज्ञांमार्फत सखोल वैज्ञानिक मार्गदर्शन प्रकल्प नेटवर्क युथ या संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने 12 ते 35 या वयोगटातील युवक आणि पालकांसोबत मार्गदर्शन कार्यशाळा सुरू आहेत.
व्यवसाय किंवा नोकरी करणार्या युवकांची जीवन पद्धती, संघर्ष, युवकांची वैयक्तिक व कामांच्या ठिकाणी होणारी हेळसांड तसेच आयुष्यातील आकस्मिक उद्भवणार्या संघर्षांचा समतोल कसा साधावा, यासाठी तज्ज्ञांमार्फत सखोल शास्त्रीय प्रशिक्षण सुरू आहे. युवकांच्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी त्यांना परिपक्व करण्याचे काम संस्था विनामूल्य करत आहे. नव्यानेच सुरू झालेल्या या संस्थेचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मानस आहे.
-डॉ. राम गुडगिला, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ.