नेताजींचा अपघाती मृत्यू नाहीच : फ्रान्सचा अहवाल

0

आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला, हे शोधण्यासाठी भारत सरकारने तीन आयोगांची स्थापना केली. त्यातील शाह नवाज समिती (1956) आणि खोसला आयोग (1970) या दोघांच्या अहवालात नेताजींचा मृत्यू तैवान येथे 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघात झाल्याचे म्हटले आहे. मुखर्जी आयोगाने मात्र वेगळा निष्कर्ष काढला होता. त्यामुळे विचारवंतांची नेताजींचा मृत्यू कशामुळे झाला, हे शोधण्याची धडपड थांबलेली नाही.

पॅरिस येथील इतिहासतज्ञ प्रा. जे.बी.पी. मोरे यांनी 11 डिसेंबर 1947 रोजीच्या फ्रान्सच्या त्या गुप्त अहवालावर प्रकाश टाकला आहे. ज्यामध्ये नेताजींचा मृत्यू हा विमान अपघातात झाला नाही, ते अद्याप जिवंत आहेत, असे त्या अहवालात म्हटले होते. कागदोपत्रही नेताजींचा तैवान येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याचे म्हटले नसल्याचे मोरे यांनी नमुद केले आहे. ते पॅरिस येथील शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक आहेत. प्रा. मोरे यांच्या म्हणण्यानुसार, फ्रेंच अहवालातील थोडक्यात आढावा घेतला असता, नेताजी इंडोचीन येथून जिवंत पळून गेेले होते, त्यानंतर ते बेपत्ता झाले. ब्रिटीश आणि जपान सरकारने नेहमीच नेताजींचा मृत्यू अपघाती झाल्याचे म्हटले आहे, मात्र फ्रान्स सरकारने त्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे भारत सरकारने मुखर्जी आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.