भुसावळ । देश पारतंत्र्यात असताना देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी विविध मार्गांचा अवलंब करुन काम केले. यात काहींनी अहिंसेच्या मार्गाने काम केले मात्र ज्या वेळेस ब्रिटन संकटात असताना शत्रु संकटात असताना त्यांना अडचणीत आणणे योग्य नाही अशी भुमिका गांधीजींनी घेतली. मात्र त्याच वेळी देशाला मुक्त करायचे असेल तर हिच योग्य संधी असून ब्रिटीशांना देशातून खडाळून लावा असा संदेश नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला. मात्र दुर्दैवाने देशाची सुत्रे नेताजींकडे न जाता हि चुकीच्या विचारधारा बाळगणार्यांच्या हाती गेल्यानेच देशाचे मोठे नुकसान झाले असल्याचे खंत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्राचे अभ्यासक अंबरिष पुंडलिक यांनी व्यक्त केली.
अहिल्यादेवी कन्या विद्यालयात जनविकास मंडळातर्फे तापी प्रेरणा श्रवण उत्सवानिमित्त ‘नेताजी एक क्रांतीपर्व’ या विषयावर आयोजित व्याख्याना प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जनविकास मंडळाचे अध्यक्ष पंडित सारखे, जेष्ठ स्वयंसेवक मामा पुराणिक यांची उपस्थित होती.
महाविद्यालयीन जीवनापासून सुभाष बाबुंना देशासाठी काम करण्याची उर्मी होती, कलकत्ता हि क्रांतीकारकांशी काशी म्हटली जायची अशा कलकत्ता शहरात त्यांची जडण घडण झाल्यामुळे साहजिकच सुभाष बाबुंवर देशभक्तीचे संस्कार रुजले. वंगभंग आंदोलनानंतर देशात क्रांतीकारी चळवळी वाढल्या याच्याशी सुभाष बाबुंचा संबंध आला. यादरम्यान स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ वाचनामुळे स्वामींजींच्या विचारांनी देखील त्यांना प्रेरणा मिळाली. सुभाषबाबुंनी वडीलांच्या इच्छेखातर लंडनला जाऊन आयसीएसची परिक्षा दिली. यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर सुध्दा ब्रिटीशांची नोकरी न करता देशासाठी काम करण्याचा निर्णय घेऊन सुभाषबाबुंनी आयसीएसचा राजीनामा देऊन पुन्हा मायदेशी परतले. चित्तरंजन दास यांच्या सोबत त्यांनी काम सुरु केल्याचे पुंडलिक यांनी सांगितले.
आझाद हिंद सेनेची उभारणी करुन दिला लढा
यावर पुढे बोलतांना पुंडलिक यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील विविध घटनांवर प्रकाश टाकला ते म्हणाले की, नेताजींनी असंख्य अडचणींचा सामना करुन प्रसंगी जिवाची पर्वा न करता भारतातून वेषांतर करुन जर्मनी व नंतर जपानमध्ये जाऊन आझाद हिदं सेनेची स्थापना करुन ब्रिटीशांविरुध्द एक भक्कम लढा दिला, अशा महापुरुषांचे कार्य तरुणांनी समोर ठेवून मायभुमीच्या उत्थानासाठी संघ भावनेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पुंडलिक यांनी केले.
शिव चरित्रातून घेतला बोध
इंग्रजांनी सुभाषबाबुंना घरात नजरकैद केले असताना शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचा बोध घेऊन त्यांनी वेषांतर करुन 65 पोलीसांचा कटेकोट पहारा चुकवून दिल्ली, पेशावर, काबुल मार्गे पलायन केले. त्यांनी बर्लिनला गेल्यानंतर भारतीय बंद्यांना सोबत घेऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली. यानंतर त्यांनी जर्मनीतून पाणडुबीद्वारे जपानला आले. जपानच्या मदतीने सिंगापूर येथेही सैन्य जमवून लढा उभारला. जगात सर्वप्रथम राणी झाशी नावाने महिलांची फौज निर्माण करणे सुभाषबाबु हे एकमेव असल्याचे पुंडलिक यांनी स्पष्ट केले.