नवी दिल्ली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचा सस्पेन्स दूर होत आहे. नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच झाल्याची माहिती भारत सरकारने दिली. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते सायक सेन यांनी ही याचिका दाखल केली होती. त्याला गृहमंत्रालयाने उत्तर दिलं आहे.
नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला होता, असा स्पष्ट उल्लेखही उत्तरात केला आहे. आरटीआयमध्ये दिलेल्या उत्तरामुळे नेताजींचे कुटुंब नाराज झाले आहे. हे वर्तन अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. प्रकरण अजून उलगडलेले नाही, तरीही केंद्र सरकार अशाप्रकारचे उत्तर कसे काय देऊ शकते?, असा प्रश्न नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांनी विचारला आहे. भारत सरकारने नेताजींच्या मृत्यूसंबंधित 37 फाइल्स जारी केल्या होत्या. त्यात पृष्ठ क्रमांक 114 ते 122 वर याची माहिती दिली आहे, असंही उत्तरात म्हटले आहे. शिवाय उत्तरात शाहनवाज समिती, न्यायमूर्ती जी.डी. खोसला आयोग आणि न्यायमूर्ती मुखर्जी आयोगाच्या अहवालाचा हवाला दिला आहे.