नेतृत्वाअभावी जिल्हा राष्ट्रवादी दिशाहीन

0

चेतन साखरे,जळगाव : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणार मोठा वर्ग आहे. पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे पाहून निवडणूकांमध्ये पक्षाला निश्‍चितपणे हक्काचे मतदान मिळतेच. मात्र जिल्ह्यात असा एकही प्रभावी आणि सक्षम नेता नसल्याने सत्ता असतांनाही राष्ट्रवादी दिशाहीन झाली आहे. जिल्हा राष्ट्रवादीच जे काही नेते आहेत ते आपापल्या साम्राज्यापुरते मर्यादीतच राहीले आहेत. जळगाव जिल्ह्यात युतीला केवळ 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सुरूंग लावला होता. तेव्हा अकरापैकी एकट्या राष्ट्रवादीचे सहा आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद मोठी होती. मात्र ही स्थिती केवळ पाच वर्षांपूरताच मर्यादीत राहीली. 2014 मध्ये भाजपाने लोकसभेपासून ते पंचायत समित्यांपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व सिध्द केले. त्यानंतर राष्ट्रवादीची दिशा भरकटलेलीच दिसून आली.

नेते आणि त्यांचे साम्राज्य
जिल्हा राष्ट्रवादीत कधीकाळी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे नेतृत्व होते. त्यांच्याच नेतृत्वात जिल्हा बँकेसारखी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आली होती. त्यावेळी माजी खा. जैन यांचा शब्द प्रमाण होता. खासदार शरद पवार यांच्याशी असलेले घनिष्ट संबंध आणि एकछत्री नेता म्हणून त्यांनी जिल्ह्याची कमान सांभाळली होती. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात त्यांचे चिरंजीव मनीष जैन अपक्ष (शिवसेनेच्या बळावर) म्हणून उभे राहीले आणि जिंकूनही आले होते. पक्षाशी गद्दारी केली म्हणून माजी खासदार जैन यांच्याविरोधात जिल्ह्यातील नेत्यांनी आगपाखड केल्याने ते आज पक्षापासून चार हात लांब आहेत.

पारोळ्याचे डॉ. सतीश पाटील हे पालकमंत्री असतांना त्यांनी नदीजोड सारखी जिल्ह्यात विकासाची कामे केली. या कामांचीच पावती म्हणून ते 2014 मध्ये मोदी लाटेतही निवडून आले होते. त्यानंतर जिल्ह्याची धुरा आपसूकपणे त्यांच्याकडेच आली. मात्र डॉ. सतीश पाटील आणि देवकर समर्थक यांच्यातील शीतयुध्दामुळे संघटना बांधणी होऊ शकली नाही. जळगाव ग्रामीणचे गुलाबराव देवकर यांचे शहरात वास्तव्य आहे. ते जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवित असल्याने त्यांचे शहराकडे दुर्लक्षच राहीले आहे. पालकमंत्री असतांना त्यांनी मतदारसंघात बहिणाबाई चौधरी स्मारक, ठोंबरे स्मारक, जळगाव शहरातील बंदीस्त नाट्यगृह अशा अनेक कामांना चालना दिली. मात्र देवकरांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकांना डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी खा. ईश्वरलाल जैन समर्थकांची गैरहजेरी ही पक्षातील गटबाजीचे दर्शन घडवित होती. त्यामुळे संपुर्ण जिल्हा काबीज करणे त्यांनाही शक्य झालेच नाही.

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे आक्रमक नेतृत्व राष्ट्रवादीकडे आहे. त्यांच्याकडे युवकांची मोठी फौजही आहे. मात्र कायम ‘नो चिंता’ म्हणत हवेवर जगणार्‍या संतोष चौधरींची छाप ही भुसावळ शहरापूरताच मर्यादीत राहीली. विधानसभा अध्यक्ष राहीलेले चोपड्याचे माजी आमदार अरूणभाई गुजराथी हे गोडबोले म्हणून ओळखले जातात. मात्र संघटना बांधण्याचे गणित त्यांनाही कधी जमलेच नाही. पाचोरा-भडगावचे दिलीप वाघ, चाळीसगावचे राजीव देशमुख हे दोन्ही नेते तर त्यांच्याच तालुक्यापुरता मर्यादीत राहीले. त्यांचा संघटनेला फारसा उपयोगही कधी झाला नाही. पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचे अर्धे आयुष्य एकनाथराव खडसे यांच्याशी संघर्ष करण्यातच गेले. खा. शरद पवार यांचे मानसपुत्र असलेल्या रवींद्रभैय्या हे मवाळ स्वभावाचे असल्याने राजकीय वैर घेण्यात ते नेहमीच कमी पडले आहेत. आक्रमक नसल्याने पक्ष बांधणी करतांना प्रत्येकाची मर्जी सांभाळण्यातच त्यांची टर्म सुरू आहे. गिरणा आणि तापी पट्ट्यात सर्वसमावेशक असे एकछत्री नेतृत्व नसल्यानेच राष्ट्रवादी भरकटलेली दिसत आहे.