नेते पक्ष का सोडताय याचे आत्मचिंतन शरद पवारांनी करावे: फडणवीस

0

नागपूर: राज्यातील बडे नेते सेना भाजपात प्रवेश करत आहेत, यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पक्षांतरासाठी दबाव आणला जातो आहे असे आरोप शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ‘दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भाजपला गरज नसून, शरद पवार यांच्या पक्षातील नेते पक्ष का सोडत आहेत, याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांना टोला लगावला आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पवार यांच्या टीकेला उत्तर दिले.

भारतीय जनता पक्षाकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार येण्यास उत्सुक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र ज्याची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे अशांना आम्ही घेणार नाही. कुणाला दबाव टाकून पक्षात घेण्याइतका आमच्याकडे वेळ नाही. भारतीय जनता पक्ष कुणाच्या मागे धावेल अशी पक्षाची स्थिती नाही, असेही फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षाने कधीबी दबावाचे राजकारण केले नाही. आमच्याकडे मोदी यांच्यासारखा मोठा नेतै आहे, असे सांगत लोक का बाहेर जातात याबाबत पवार यांनी आत्मचिंतन करायला हवे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

आमच्या सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. अनेक साखर कारखानदारांना मदत केली आहे. त्यावेळी आम्ही त्यांना त्या बदल्यात पक्षात या असे कधीही म्हटले नाही, याकडेही मुख्यमंत्र्यानी लक्ष वेधले.