नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी चित्रपट हे उत्तम माध्यम

0

पुणे । अवयवदान व नेत्रदानासारख्या विषयांबाबत समाजात जवळपास 90 टक्के व्यक्तींच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते. नवीन पिढी शिक्षित असूनही अवयवदान केल्यास पुनर्जन्म मिळत नाही किंवा नेत्रदान केल्यास भुताचा जन्म मिळतो अशा खुळ्या कल्पना अस्तित्वात आहेत. ‘वॉटस अ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’मध्ये रमणार्‍या नव्या पिढीपर्यंत हे विषय चित्रपटांच्या माध्यमातून पोहोचवल्यास त्यांना ते सहज कळू शकतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॉ. लहाने आणि यूएसके फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. उषा काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लहाने बोलत होते. अ‍ॅड. चेतन गांधी, प्रकाश मगदूम, अतुल शहा, पी. एम. मुनोत शरद मुनोत, दिग्दर्शक मंगेश जोशी, डॉ. लीना बोरूडे, सुनील भोंडगे यावेळी उपस्थित होते. आरोग्याशी निगडित असलेले विविध विषय केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या लघुपट व माहितीपटांचा हा महोत्सव एनएफएआयमध्ये सुरू असून शनिवारी (दि.23) स. 11 ते दु.4.30 या वेळात यातील वीस चित्रपट पाहता येणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते आलोक राजवाडे व पर्ण पेठे यांच्या उपस्थितीत याचा समारोप करण्यात येणार आहे.

डॉ. लहाने म्हणाले, देशात 22 लाख व्यक्तींना डोळ्यांची गरज असून त्यात 2 लाख लहान मुलांचा समावेश आहे. दर 80 लाख मृत व्यक्तींमागे केवळ 50 हजार व्यक्तींचे नेत्रदान केले जाते. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात जीवंत राहणार्‍या अवयवाचा एक प्रकारे पुनर्जन्मच होतो, असे म्हणावे लागेल. समाजात अवयवदान व नेत्रदानाविषयी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. हे गैरसमज दूर करून या विषयांवर जनजागृती करणे गरजेचे आहे.अ‍ॅड. गांधी म्हणाले, महाराष्ट्रासह सहा राज्यांमधून तसेच इराण व बेल्जियममधूनही आरोग्य चित्रपटांचा समावेश यामध्ये आहे. 63 आरोग्य चित्रपटांपैकी निवडक 30 आरोग्य चित्रपट महोत्सवात दाखवले जात आहेत. उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला असून इतर गोष्टींपेक्षा तब्येतीवर गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे उषा काकडे यांनी सांगितले.